माणुसकीच्या धाग्यांनी रुपेशला तारले..! Print

खास प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वी बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या ट्रकखाली येऊन जबर जखमी झालेल्या रुपेश डकोलिया याला माणुसकीच्या धाग्यांनी तारले आहे. आता पूर्ण बरे होण्यासाठी त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २१ जून रोजी यासंदर्भात ‘ठाणे वृत्तान्त’मध्ये ‘तुटलेले धागे सांधण्यासाठी हवा माणुसकीचा धागा!’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यात केलेल्या आवाहनानुसार वाचकांनी रुपेशच्या उपचारांसाठी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व थरांतील वाचकांनी यथाशक्ती दिलेल्या मदतीतून सव्वा दोन लाख रुपयांचा निधी जमा झाला. त्यातून कौशल्य मेडिकल फाऊंडेशनच्या रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
आता दिवाळीनंतर त्याच्या पोटावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. धुणी-भांडी करून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात रुपेशसह इतर दोन भावंडांचा कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या रूपा डकोलिया यांना उपचारांचा खर्च परवडणारा नव्हता. रुपेशच्या शिक्षिका प्रणिता पोंक्षे यांनी पुढाकार घेतल्यानेच त्याच्यावर उपचार होऊ शकले. मात्र आता त्याच्या दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी अजून सव्वा लाख रुपयांची आवश्यकता आहे. दिवाळीनंतर त्याच्यावर ही शस्त्रक्रिया आहे. त्यासाठी नागरिकांनी यथाशक्ती मदत करावी, असे आवाहन पोंक्षे यांनी केले आहे. संपर्क-प्रणिता पोंक्षे, महापालिका शाळा क्र. १९, आंबेडकर चौक, डॉ. भानुशाली हॉस्पिटलजवळ, आलोक हॉटेलसमोर, ठाणे (प.) मोबाइल-८६९३०००४७७.