आठ महिन्यांनंतर स्थायी समितीला मुहूर्त Print

शुक्रवारच्या सभेत ७६ प्रस्ताव
प्रतिनिधी
तब्बल आठ महिन्याच्या अवधीनंतर ठाणे महापालिका स्थायी समितीच्या बैठकीसाठी अखेर मुहूर्त सापडला असून समितीची पहिली बैठक येत्या शुक्रवारी २ नोव्हेंबरला होणार आहे. या बैठकीच्या विषयपत्रिकेवर शहरातील महत्वाच्या विकासकांमांविषयी सुमारे सुमारे ७६ प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले आहेत.
ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आठ महिन्यांपूर्वी पार पडली. त्यानंतर महापालिकेत शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. मात्र, महापालिकेतील अर्थकारणाची नाडी म्हणून ज्या स्थायी समितीचा उल्लेख होतो, ती स्थायी समिती गेल्या आठ महिन्यांपासून राजकीय वादात तसेच न्यायालयाच्या फेऱ्यात अडकल्याने गठित होऊ शकली नव्हती. त्यामुळे समितीची एकही बैठक झाली नाही. तसेच स्थायी समितीचा कारभार ठप्प असल्याने महापालिकेतील अर्थकारण काहीसे थंडावले होते. दरम्यान, शहरातील महत्वाच्या विकासकामांचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. मात्र, या निवडणुकीनंतरही स्थायी समितीची बैठक अद्याप झालेली नसून समितीच्या पहिल्या बैठकीला येत्या २ नोव्हेंबर रोजी मुहूर्त सापडला आहे. या बैठकीच्या विषयपत्रिकेवर सुमारे ७५ प्रस्ताव असून त्यामध्ये जलवाहिन्या, रस्ते, कचरा संकलन, अशा महत्वाच्या प्रस्तावांचा समावेश आहे.