ठाणे शहर होर्डिगमुक्त होणार! Print

आपलं शहर आपला आवाज
ठाणे / प्रतिनिधी
‘लोकसत्ता’ आणि ‘झी २४ तास’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आपले शहर आपला आवाज’ कार्यक्रमात उपस्थित सर्वपक्षीय प्रतिनिधींनी ठाणे शहर होर्डिगमुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले. आता हे आश्वासन खरे ठरेल अशी अपेक्षा ठाण्यातील नागरिक व्यक्त करु लागले आहेत. येथील गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पॅनलवर महापौर हरिश्चंद्र पाटील, भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले,  महापालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, मनसेचे प्रवक्ते राजन गावंड आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी ठाणे शहराचे विविध प्रश्न उपस्थितांसमोर मांडले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या.
उपस्थित नागरिकांनी शहरात लावल्या जाणाऱ्या ‘राजकीय’ होर्डिगमुळे होणाऱ्या विद्रुपीकरणाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.  उपस्थित नेत्यांनी यापुढे शहरात कोणत्याही राजकीय कार्यक्रमाचे तसचे नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे होर्डिग न लावता शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले. यामुळे आता हेच राजकीय प्रतिनिधी आपले आश्वासन कितपत पाळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
याचबरोबर शहरातील वाहतूक कोंडी, ढासळलेली परिवहन सेवा, अनाधिकृत बांधकामे, राजकीय पक्षांची अनधिकृत जनसंपर्क कार्यालये, अनधिकृत मोबाईल टॉवर, महापालिकेच्या माध्यमातून शिक्षणसंस्थांना दिलेले भूखंड, विकास आराखडय़ाची अंमल बजावणी, नागरिकांच्या प्राथमिक गरजा यांसारख्या विविध मुद्यांवर विरोधक आणि सत्ताधारी यांमध्ये चांगलीच जुंपली. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांमध्ये साटेलोटे आहे का, असा सवालही एका नागरिकाने यावेळी उपस्थित केला. यावेळी ठाण्याच्या खाडीमध्ये हजारों व्यक्तींचे कोणताही मोबदला न घेता प्राण वाचवणाऱ्या राजेश खारकर यांचा ‘अनन्य व्यक्तिमत्त्व’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.