अनधिकृत बांधकामे राजीव यांनी रोखली Print

सरनाईक यांना घरचा आहेर
महापौरांची स्तुतिसुमने
ठाणे / प्रतिनिधी
पाणीचोरीप्रकरणी महापालिकेच्या कचाटय़ात सापडल्याने आयुक्त आर.ए. राजीव यांच्यावर निशाणा साधत मुंब््रयातील अनधिकृत बांधकामप्रकरणी थेट राजीव यांना ‘टार्गेट’ करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना मंगळवारी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनीच घरचा आहेर दिला. राजीव आल्यापासून अनधिकृत बांधकामांना आळा बसला आहे, असे जाहीर वक्तव्य महापौरांनी केल्याने सरनाईक समर्थक कमालीचे अस्वस्थ झाले असून सरनाईक स्वत:च्या संघटनेतच एकाकी पडल्याचे चित्र पुन्हा एकदा पुढे आले आहे.
घोडबंदर मार्गावरील ‘विहंग व्हॅली’ गृहसंकुलात बेकायदेशीरपणे पाणीजोडणी घेतल्याप्रकरणी राजीव यांनी सरनाईक यांच्या विहंग ग्रुप या कंपनीविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सरनाईक आणि राजीव यांचे संबंध अगदी पूर्वीपासून ताणलेले राहिले आहेत. या पाश्र्वभूमीवर राजीव यांनी थेट सरनाईक यांच्या व्यावसायिक हितांवर घाला घातल्याने ताणलेल्या संबंधात तेल ओतल्यासारखे झाले आहे. राजीव यांच्या दणक्यामुळे अस्वस्थ झालेल्या सरनाईक यांनीही सध्या राजीव हटाव मोहीम हाती घेतली असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत थेट राजीव यांना परत पाठविण्याचा ठराव संमत करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. मात्र राजीव यांचे जुने मित्र असणारे राष्ट्रवादीचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी सरनाईक यांचा प्रयत्न उधळून लावला. राजीव यांच्याविरोधात शासनाकडे तक्रार पत्र पाठविण्याचा सपाटाही सध्या सरनाईक यांनी लावला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या एका पत्रात सरनाईक यांनी राजीव यांच्या तक्रारींचा पाढा वाचला असून कळवा-मुंब्रा भागांत मोठय़ा प्रमाणावर उभ्या राहात असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठी थेट राजीव यांना जबाबदार धरले आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सध्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे आहेत. त्यामुळे कळवा-मुंब््रयातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आणत राजीव यांच्यासोबत सरनाईक यांनी आव्हाड यांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे सरनाईक यांची राजीव हटाव मोहीम जोरात सुरू असली तरी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी मात्र आयुक्तांना जोरदार समर्थन देत राजीव यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याने सरनाईक समर्थक सध्या बावचळले आहेत. ठाण्यात मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात महापौरांनी ‘राजीव आल्यापासून अनधिकृत बांधकामांना आळा बसला आहे’, असे वक्तव्य केल्याने सरनाईक यांना एक प्रकारे चपराक बसल्याचे बोलले जाते. झी टीव्ही तसेच ‘लोकसत्ता’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आपलं शहर आपला आवाज’ या कार्यक्रमात एका नागरिकाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना राजीव यांच्या काळात शहरात एकही नवे अनधिकृत बांधकाम उभे राहिलेले नाही, अशी मल्लिनाथीही महापौरांनी केली. महापौरांच्या या दाव्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित असलेले सरनाईक यांचे समर्थक अस्वस्थ झाल्याचे पाहावयास मिळाले. शिवसेनेचे आमदार एकीकडे कळव्या-मुंब्रा भागांतील अनधिकृत बांधकामे वाढली, असे सांगत असताना महापौर मात्र राजीव यांचे समर्थन करू लागल्याने सरनाईक यांना हा घरचा आहेर मानला जात आहे.     

सरनाईक ज्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तेथून शिवसेनेचे तिकीट मिळावे यासाठी एकेकाळी स्वत: महापौर पाटील इच्छुक होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत येताना एकनाथ शिंदेंकडून पाटील यांनी तसा शब्दही घेतला होता. मात्र ऐन वेळेस सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पाटील यांचा पत्ता कापला गेला. त्यामुळे सरनाईक-पाटील यांच्या ताणलेल्या सख्ख्याची चर्चाही येथील राजकीय वर्तुळात आहे.