केडीएमटी गाळात Print

बंद पडणाऱ्या बस आणि वाढत्या खर्चामुळे तोटा वाढला
कल्याण / प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

दवळवळणासाठी सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने रिक्षाचालकांच्या मुजोरीचे बळी ठरत असलेल्या कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. रिक्षाला पर्याय म्हणून कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) बसेसकडे डोळे लावून बसणाऱ्या प्रवाशांना हा उपक्रम दिवसेंदिवस कसा गाळात चालला आहे, याचा अनुभव सध्या येत आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे उपक्रमाला दिवसाला सुमारे १२ लाख रुपयांचा तोटा होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केडीएमसीच्या ताफ्यात सध्या १४५ बसेस आहेत. मात्र, जेमतेम ७५ बसेस आगाराबाहेर पडतात. इतर ७० बसेस दररोज नादुरुस्ती तसेच अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आगारांमध्ये वामकुक्षी घेत असतात, अशी माहिती आहे.
उपक्रमाच्या ताफ्यातील १४५ बसेसपैकी ४५ बसेसचे आयुर्मान संपले आहे. २५ बसेस महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी नेहमीच आगारात उभ्या असतात. कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाकडे पुरेसा निधी नाही, अशा तक्रारी अगदी सुरुवातीपासून आहेत. निधी नसल्याने ही कामे थंडावली आहेत. दररोज रस्त्यावर ७५ बस धावतात. या बसेसच्या परिचालनातही अनेक त्रुटी आहेत. उपक्रमाच्या ताफ्यात मध्यंतरी टाटा कंपनीच्या ३० नव्या बसेस दाखल झाल्या. सीएनजी पद्धतीच्या या बसेसमध्ये अनेक त्रुटी असून यामधील १५ बसेस दररोज ब्रेकडाऊन होत आहेत, अशी माहिती अभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे उत्पादक कंपनीला उपक्रमाने ५० लांखाहून अधिक दंड ठोठावला आहे, असे उपक्रमातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
बस चालू असताना स्टेरिंग निखळणे, खिडक्यांच्या काचा चालत्या गाडीतून खाली पडणे, गाडीची संपूर्ण बॉडी हलणे यांसारख्या तक्रारी नित्याच्या होऊ लागल्या आहेत. उपक्रमाची आर्थिक परिस्थिती सध्या वाईट असून महापालिकेमार्फत तीन कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासनही अद्याप पूर्ण झालेले नाही. नियोजन नाही, पैसा नाही, परिवहन समिती सभापती, सदस्यांना उपक्रमाविषयी, प्रवाशांविषयी आपुलकी नाही. त्यामुळे उपक्रम दिवसेंदिवस गाळात चालला असल्याची टीका केली जात आहे.