हार्बर मार्गावरील स्थानकांचा विस्तार निधीअभावी रखडणार Print

प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द पर्यंतच्या रेल्वे स्थानकांचा विस्तार करण्यासाठी लागणारा निधी आणि रेल्वे डब्यांची कमतरता यामुळे सध्या केवळ १० डब्यांचीच गाडी चालवणे शक्य असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी बुधवारी स्पष्ट केले. पश्चिम रेल्वेकडे सध्या डीसी विद्युत यंत्रणेवर चालणाऱ्या उपनगरी गाडय़ा यार्डात पडून असून त्या मध्य रेल्वेला देण्याची विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हार्बर मार्गावरील वाशीपुढील पनवेलपर्यंतच्या स्थानकांचे फलाट १२ डब्यांची गाडी उभी राहू शकेल इतके लांब आहेत. मात्र, मानखुर्दपर्यंतच्या १५ स्थानकांचा विस्तार करण्यासाठी किमान ७० कोटी रुपये लागणार आहेत. सिग्नल यंत्रणा बदलण्यासाठी आणखी काही निधी लागणार असून संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची गरज आहे. निधी रेल्वे बोर्डाकडून मंजूर झाल्यावरच १२ डब्यांची गाडी हार्बर मार्गावर धावू शकेल. छत्रपती शिवाजी टर्मिनस, सॅण्डहर्स्ट रोड, डॉकयार्ड रोड, कॉटन ग्रीन या स्थानकांचा विस्तार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असे जैन यांनी सांगितले. मध्य रेल्वेकडे सध्या चार ते पाच मोटर कोच उपलब्ध असून त्याच्या सहाय्याने चार ते पाच गाडय़ा १० डब्यांच्या होतील. म्हणजेच त्यांच्या सुमारे ८० फेऱ्या दिवसभरात होतील, असे ते म्हणाले. चुनाभट्टी येथील फाटक बंद केल्याशिवाय हार्बर मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढविणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.हार्बर मार्गावरील विद्युत यंत्रणा ही डीसी यंत्रणा असून पश्चिम रेल्वेकडे असलेल्या या यंत्रणेवर चालणाऱ्या गाडय़ा सध्या रेल्वे यार्डात उभ्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे एसी विद्युत यंत्रणेवर रूपांतरण झाल्यामुळे या गाडय़ा बाजूला करण्यात आल्या आहेत. या गाडय़ा मध्य रेल्वेला मिळाव्यात अशी विनंती करण्यात आली असून त्यानुसार गाडय़ा मिळाल्या तर हार्बरवरील गाडय़ांची संख्या वाढू शकेल, असेही जैन यांनी सांगितले.