थकित कर भरणाऱ्यांना गाळे परत देण्याचा प्रस्ताव Print

ठाणे / प्रतिनिधी
धर्मवीरनगर तसेच तुळशीधाम येथील मालमत्ता करापोटी जप्त करण्यात आलेल्या गाळेधारकांनी मालमत्ता कराची थकबाकी भरण्यास तयारी दर्शविली असून ठाणे महापालिका प्रशासनाने त्यांना त्यांचे गाळे परत देण्याविषयी प्रस्ताव तयार केला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला आहे.
महापालिकेने वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत रस्ता रूंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये बाधीत झालेल्यांना धर्मवीरनगर तसेच तुळशीधाम परिसरात पुनर्वसन गाळे देण्यात आले होते.  या गाळ्यांवर महापालिकेने जप्तीची कारवाई केली आहे. मात्र, असे असले तरी हे गाळे पालिकेच्या मालकीचे असल्यामुळे लिलावाची कारवाई करता येऊ शकत नाही. त्यामुळे हे गाळे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. तसेच वर्षभरापूर्वी महापालिका प्रशासनाने या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समिती बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्यानुसार हे गाळे स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यात देण्यास स्थायी समितीने त्यावेळी मान्यता दिली होती.