महापौरपदासाठी मनसेची खलबते Print

कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक नेतेही अंधारात?
कल्याण/ भगवान मंडलिक - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
येत्या सहा महिन्यांत कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महापौरांची अडीच वर्षांची मुदत संपत असल्याने या पदावर दावा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक नेत्यांना अंधारात ठेवून वरिष्ठ पातळीवर मोठय़ा हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते. ठाणे पालिकेत शिवसेनेने निवडणुकीनंतर मनसेला दिलेला धोबीपछाड विचारात घेऊन, तसेच जिल्ह्य़ातील शिवसेनेचे अस्तित्व खिळखिळे करण्याचा विडा उचललेल्या जिल्ह्य़ातील काँग्रेस आघाडीच्या नेत्यांचाही मनसेच्या या सुप्त हालचालींमध्ये तुरळक सहभाग असल्याचे बोलले जात आहे. ठाणे पालिकेत स्थायी समिती सभापतीपद काँग्रेसला देऊन राष्ट्रवादीने या पालिकेतील आपला आर्थिक वरचष्मा कायम ठेवला.
त्याच धर्तीवर कल्याण-डोंबिवली पालिकेतील महापौर पद तडजोडीने पटकावून शिवसेनेला ठेंगा दाखवायचा. सेनेच्या जिल्हा, मुंबईतील नेत्यांना नामोहरम करायचे अशी खेळी या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर आखली जात असल्याचे समजते. या सर्व प्रक्रियेत स्थानिक मनसे, काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. २०१४ च्या निवडणुकांची तयारी म्हणून ठाणे जिल्ह्य़ातील पालिकांमधील शिवसेना-भाजप युतीची सत्ता खिळखिळी करायची.
दरम्यानच्या काळात राज्य सरकारच्या माध्यमातून या पालिकांना भरघोस निधी मिळवून झटपट विकासकामे करायची आणि युतीच्या सत्तेला काळ्या यादीत टाकून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे ढोल पिटायचे अशीही खेळी यामागे आघाडीच्या नेत्यांकडून खेळली जात आहे.  सेनेच्या जिल्हा नेतृत्वाची यापूर्वीसारखी संपलेली सद्दी, अंतर्गत गटबाजीच्या राजकारणानेही शिवसेनेत निर्माण झालेले कलह, भाजपच्या नगरसेवकांना सेनेकडून महासभेत मिळत असलेली दुय्यम दर्जाची वागणूक या सर्व खेळींचा उपयोग आगामी महापौर पद बदलण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते.    या सर्व सत्ता बदलात ठाण्यातील आघाडातील नेते, मनसेचा डोंबिवलीतील एक बडा नेता गुफ्तगू करीत असल्याचे बोलले जात आहे. कल्याण पालिकेतील शिवसेनेत पेणकर गट, दीपेश म्हात्रे गट, मल्लेश शेट्टी गट सक्रिय आहेत. या गटबाजीमुळे शिवसेनेत एकवाक्यता नाही. सेनेतील ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांना दहा वर्षे सत्तेत राहून एकदाही मानाचे पद देण्यात आलेले नाही. ही सल सेनेला नेहमीच सत्तेसाठी पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या मनात आहे. त्यामुळे ऐनवेळी या मंडळींची नाराजीही सेनेला भोवू शकते, असे सांगण्यात येते.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्याच्या वेळी जिल्ह्य़ातील काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर पदाच्या खेळीसाठी मनसे, काँग्रेस आघाडी, नाराज शिवसेना गट यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या सर्व हालचालींविषयी सर्वपक्षीय नेते मौन बाळगून आहेत, असे काहीही नाही एवढीच प्रतिक्रिया देण्यात येत आहे. पालिकेत शिवसेनेचे ३८ नगरसेवक, भाजपचे ९, मनसेचे २८, काँग्रेस १५, राष्ट्रवादी १७ असे पक्षीय बलाबल आहे.