विशेष विद्यार्थिनीच्या हस्ते जिद्दी प्राध्यापकाचा काव्यसंग्रह प्रकाशित Print

ठाणे/प्रतिनिधी
गेल्या दहा महिन्यांपासून मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलेसिसवर असलेले अंबरनाथ येथील प्रा. उदय क्षीरसागर यांच्या ‘सहज सुचले म्हणून’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अलीकडेच शहरातील ब्राह्मण सभा सभागृहात ठाण्यातील जिद्द शाळेची राष्ट्रपती पारितोषिक विजेती माजी विद्यार्थिनी मनाली कुलकर्णी हिच्या हस्ते झाले. प्रा. क्षीरसागर यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रंगत आणली. त्यांनी ताल-तरंग हा कार्यक्रम सादर केला. त्याचप्रमाणे बदलापूर येथील माऊली कृपा डान्स अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही बहारदार समूहनृत्ये सादर केली. क्षीरसागर यांचे सारे आप्तस्वकीय या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रा. उदय क्षीरसागर अंबरनाथमधील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात आहेत. डिसेंबरपासून मूत्रपिंडांचा आजार बळावल्याने आठवडय़ातून तीन वेळा त्यांना डायलेसिस करावे लागते. मात्र या आजारातही क्षीरसागर यांचा उत्साह कायम असून त्यात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची साथ मिळते. त्यांच्या पत्नी ऐश्वर्या जिद्द शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्या पुढाकारानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पं. सदाशिव पवार, अनिल पालये आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सदाशिव पवार यांचे पुत्र रूपक व निषाद यांच्या तबला जुगलबंदीस विशेष दाद मिळाली.