नगराध्यक्षपदासाठी अंबरनाथमधील सत्तासंघर्ष टिपेला..! Print

दिवाळीपूर्वीच नगरसेवक सुट्टीवर..  
खास प्रतिनिधी
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीत अल्पमतात आलेल्या शिवसेनेने बदललेल्या आरक्षणाचा फायदा घेत अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा विद्यमान नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनाच उमेदवारी दिल्याने येथील सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला आहे. सत्तेच्या या साठमारीत घोडेबाजाराला ऊत आल्याने कोणत्याही आमिषांना बळी पडू नयेत म्हणून दोन्ही गटांनी करडय़ा पहाऱ्यात आपापल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शहरातील बहुतेक लोकप्रतिनिधी सुट्टीवर गेले आहेत. ते आता थेट सोमवारी निवडणुकीच्या वेळीच पालिका सभागृहात येणार आहेत.   
बदलापूरमध्ये सेना-भाजपसोबत महायुतीत असणारी मनसे तिथून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील अंबरनाथमध्ये मात्र उघडपणे काँग्रेस आघाडीसोबत आहे.
पाच समित्यांचे सभापतीपद देऊन काँग्रेस आघाडीने मनसेची सहा मते मिळवली आहेत.  त्यामुळे नाराज झालेले काही स्वपक्षीय सध्या ‘नॉट रिचेबल' असल्याने आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. दुसरीकडे सेनेसाठीही ही निवडणूक तितकीशी सोपी नाही. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्तेवरून पायउतार करण्याचा चंग आघाडीने बांधला आहे. त्यासाठी  पालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनगटावर राष्ट्रवादीचे घडय़ाळ बांधणारे खासदार आनंद परांजपे, कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष किसन कथोरे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नागरी सुविधांचा बोजवारा..!
पालिकेतील सत्तासंघर्षांमुळे शहरातील नागरी सुविधांचा मात्र अक्षरश: बोजवारा उडाला आहे. शहरातील सर्व रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण उडाली असून दिवाळीपूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत.
नियमित औषध फवारणी नसल्याने शहरात डासांचे साम्राज्य आहे. लोकप्रतिनिधी मात्र सत्ताकारणातच मग्न नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे.