मृत्यूच्या दाखल्यासाठी ठाणेकरांची वणवण Print

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांच्या तक्रारी
ठाणे / प्रतिनिधी ,
ठाणे शहरातील बहुतांश स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून तेथे सुरक्षारक्षक तसेच नोंदणी अधिकारी नसतो. त्यामुळे मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशी धक्कादायक माहिती शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत सदस्यांनी सभागृहात दिली. तसेच शहरातील सर्वच स्मशानभूमीच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयी अहवाल सादर करण्याची मागणीही त्यांनी केली.
महापालिका प्रशासनाने घोडबंदर येथील डोंगरीपाडा स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीसमोर आणला होता. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करण्याआधी शहरातील स्मशानभूमी दुरवस्थेच्या मुद्दय़ावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या सदस्या मीनाक्षी शिंदे यांनी मानपाडा येथील स्मशानभूमीचा दाखला देत शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याचे सांगितले. तसेच स्मशानभूमीमध्ये मृतदेहाची नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकारी नसतो. त्यामुळे स्मशानभूमीत मृतदेहावर झालेल्या अंत्यविधीची नोंद मिळत नसल्याने नागरिकांना मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी अनेक अडचणींना समोरे जावे लागते. तसेच स्मशानभूमीमध्ये सुरक्षारक्षकही नसतात. शहरातील बहुतांश स्मशानभूमीची अशीच अवस्था आहे, असेही त्यांनी सांगितले. नोंदणी अधिकारी तसेच सुरक्षारक्षक नसल्याने हत्या करण्यात आलेल्या मृतदेहाचीही स्मशानभूमीमध्ये विल्हेवाट लावली जात असावी, अशी भीती व्यक्त करत स्मशानभूमीमध्ये नोंदणी अधिकारी तसेच सुरक्षारक्षक तातडीने नेमण्याची मागणी त्यांनी केली. त्याच पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे सदस्य हनुमंत जगदाळे यांनी शहरातील सर्व स्मशानभूमीच्या सद्यस्थितीची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली. त्यावर महापालिका प्रशासनाने पुढील सभेत याविषयी अहवाल सादर करू, असे आश्वासन दिले.