आनंदवनाच्या सुरेल हाकेस उदंड प्रतिसाद Print

* आज-उद्या मुंबईत स्वरानंदवनचे प्रयोग
*  शेवटचा प्रयोग गुरूवारी डोंबिवलीत
ठाणे/प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

आपल्यातील व्यंगाविषयी कोणतेही न्यून न बाळगता उलट अतिशय आनंदाने जीवन जगणाऱ्या, बाबा आमटे यांच्या आनंदवनातील कलावंतांनी सादर केलेल्या ‘स्वरानंदवन’ या वाद्यवृंदास ठाणेकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. वरोरा येथील महारोगी सेवा समिती आणि मुंबई ठाण्यातील आनंदवन मित्र मंडळाने या वाद्यवृंदाचे पाच प्रयोग आयोजित केले आहेत. शनिवार-रविवारी ठाण्यात झालेल्या दोन प्रयोगांना हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला असून या आठवडय़ात मुंबईत बोरिवली, जोगेश्वरी आणि डोंबिवली येथे प्रत्येकी एक प्रयोग होणार आहे.
आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोग्यांमधील कलावंतांच्या अभिव्यक्तीस व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या स्वरानंदवन या वाद्यवृंदास देशभरात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत या कार्यक्रमाचे हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत. जुनी-नवी हिंदी-मराठी गाणी, समूहनृत्ये, मिमिक्री असा हुकमी मनोरंजनाचा फॉम्र्युला घेऊन आनंदवनमधील तब्बल १२५ कलावंत या कार्यक्रमानिमित्त मुंबईत आहेत. शनिवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात झालेल्या पहिल्या प्रयोगास ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, महापालिका आयुक्त आर. ए. राजीव तर रविवारी गडकरी रंगायनमध्ये झालेल्या कार्यक्रमास ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाईन, दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही!’ या बाबा आमटे यांच्या कवितेचे कृतिरूप दर्शन असणाऱ्या ‘स्वरानंदवन’च्या ईविष्कारास ठाणेकरांनी मन:पूर्वक दाद दिली. कार्यक्रमादरम्यान निवेदक रवी गंटोलकर यांनी कलावंतांचा परिचय करून दिला. त्याचप्रमाणे विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांनी बाबा आमटे यांच्या कवितांचे वाचन केले. कधीही गाणे न ऐकलेल्या कर्णबधिर मुलांनी सादर केलेल्या ‘मेड इन इंडिया’ गीतावरील नृत्याविष्काराने रसिक भारावले. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वाद्यवृंदाचे संचालन सदाशिव ताजने करतात. मुंबई-ठाण्यात सध्या सुरू असलेल्या दौऱ्याचे संयोजन सुयोग मराठे, स्वप्ना नागवेकर, सचिन नागवेकर, सुजाता गोगटे आणि सायली जोशी यांनी केले आहे.    

आनंद आणि आरोग्यनिधी
स्वरानंदवनच्या या उपक्रमातून कलावंतांना आनंद मिळतोच, शिवाय त्यातून जमा होणारे मानधन आनंदवन परिवाराच्या औषधनिधीत जमा होते. वर्षभरात कलावंत दोन दौरे करतात. एका दौऱ्यात साधारण सात-आठ प्रयोग होतात. या औषधनिधीस देणगी देऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांचे धनादेश डॉ. विकास आमटे, सचिव, महारोगी सेवा समिती, मुक्काम पोस्ट- आनंदवन, तालुका-वरोरा, जिल्हा वर्धा, पिन-४४२९१४ या पत्त्यावर पाठवावेत.

 वाहतूक पोलिसांचे विघ्न..
रविवारी गडकरीच्या प्रयोगासाठी स्वरानंदवनच्या तीन बस घोडबंदरमार्गे येत असताना कासारवडवली येथे पहिली बस अचानक एक रिक्षा समोर आल्याने सिग्नलला बंद पडली. त्यामुळे लगेच तप्तरता दाखवीत वाहतूक पोलिसांनी चालकास बस बाजूला घेण्यात सांगितले. सिग्नलला बस बंद झाल्याबद्दल त्याने चालकाकडून शंभर रुपये दंड वसूल केला. मात्र त्याची रितसर पावती दिली नाही. पावती मागितली असता ‘पोलीस ठाण्यात येऊन घ्या’ असे उर्मट उत्तर त्याने दिले. अत्यंत पारदर्शी व्यवहार करणाऱ्या आनंदवनमधील कलावंतांना हा अनुभव मनस्ताप देणारा ठरला. त्यामुळे कलावंतांना नाटय़गृहास पोहोचण्यास उशीरही झाला.