कल्याण डोंबिवली पालिकेच्या रूग्णालयात औषधांचा ठणठणाट Print

कल्याण/प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रूग्णालयातील औषधांचा साठा गेल्या दोन महिन्यापासून संपला असून यामुळे रुग्णांचे अक्षरश हाल सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयातील औषधसाठा संपूनही शहरातील एकाही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्याचे या प्रश्नाकडे लक्ष नसल्याने प्रशासनही याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर, कल्याणमधील रूक्मिणीबाई रूग्णालयात दररोज शेकडो रुग्णालयांचा राबता असतो. चाळी, झोपडपट्टी, ग्रामीण भागातील हे रूग्ण असतात. माफक दरात ही सेवा उपलब्ध असल्याने गोरगरीब रुग्णांचा सर्वाधिक ओढा महापालिका रूग्णालयात असतो. गेल्या दोन महिन्यापासून रूग्णालयातील औषध भांडार कक्षात औषधच उपलब्ध नसल्याने या रुग्णांचे हाल सुरूव आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे लिहून द्यावी लागत आहेत, अशी माहिती काही वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. औषधे, गोळ्या मिळत नसल्याने डॉक्टर आणि रुग्णांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.