ठेकेदाराचे कामगार संपावर.. कल्याण डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग Print

कल्याण/प्रतिनिधी
कल्याण डोंबिवलीत कचरा उचलणाऱ्या अन्थोनी वेस्ट कंपनीच्या कामगारांनी बुधवारी अचानक पगारवाढीचे कारण देऊन संप पुकारल्याने कल्याण डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कल्याणमधील ‘क' प्रभागात बाजारपेठा, मासळीबाजार असल्याने या भागाला या कचऱ्याच्या ढीगांचा सर्वाधिक फटका बसला आहे.
डोंबिवलीत उमेशनगर, देवीचापाडा, रेल्वे स्टेशन परिसर, महाराष्ट्रनगर, गरीबाचापाडा भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कल्याणमधील ‘क' प्रभागाचे सभापती मोहन उगले यांनी या ठेकेदाराच्या कामगारांच्या मनमानीचा निषेध करीत घनकचरा विभागाचे उपायुक्त अनिल डोंगले, उपायुक्त गणेश देशमुख, प्रभाग अधिकारी गणेश बोराडे यांना फैलावर          घेतले.
  शहरातील कचरा तातडीने उचलला पाहिजे असे आदेश दिले. सर्व अधिकाऱ्यांना घेऊन उगले यांनी खंबाळपाडा येथील कचरा गाडय़ांच्या वाहनतळाला भेट दिली. त्यावेळी या कचरा गाडय़ांचे टायर, अनेक सुटे भाग काढून नेण्यात आल्याचे आढळले. हेतूपुरस्सर हे प्रकार करण्यात आले आहेत, असे मोहन उगले यांनी सांगितले.  
ऐन दिवाळीच्या तोंडावर ठेकेदाराचे कामगार पालिकेला वेठीस धरणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. अधिकाऱ्यांना सणासुदीत कामाला लावून नगरसेवक शहरातील कचरा उचलून घेतील, असा इशारा उगले यांनी दिला.