इलेक्ट्रॉनिक्स मीटर न बसविलेल्या ५५ रिक्षा जप्त Print

कल्याण/प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली, उल्हासनगर परिसरात कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने मंगळवारपासून रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर न बसविलेल्या चालकांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी दिवसभरात या तिन्ही शहरांमधून ५५ रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली.
आरटीओ कार्यालयातून योग्यता प्रमाणपत्र घेताना आता रिक्षा चालकांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर सक्तीने बसवून घ्यावा लागतो. त्यामुळे अनेक रिक्षा चालकांनी इलेक्ट्रॉनिक्स मीटर टाळण्यासाठी योग्यता प्रमाणपत्राकडे (पासिंग) पाठ फिरवली आहे. अशा रिक्षा चालकांना धडा शिकविण्यासाठी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांसाठी अठरा जणांची आरटीओ संजय डोळे यांनी चार पथके तयार केली. मंगळवारी सकाळपासून या पथकाने या तिन्ही शहरातील रस्ते, वाहनतळे, चौकांमधून इलेक्ट्रॉनिक्स मीटर न बसविलेल्या रिक्षा चालकांवर रिक्षा जप्त आणि दंडात्मक कारवाई केली. संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. जोपर्यंत शहरातील रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर लावले जात नाहीत तोपर्यंत अशा प्रकारच्या अचानक कारवाया चालूच ठेवण्यात येतील, असे डोळे यांनी सांगितले.
जोपर्यंत रिक्षा चालक इलेक्ट्रॉनिक्स मीटर खरेदीची पावती आरटीओ कार्यालयात आणून दाखवित नाही तोपर्यंत ती रिक्षा आरटीओ कार्यालयाच्या ताब्यात राहाणार. मीटर बसविण्याची हमी दिल्यानंतर ती रिक्षा सोडून देण्यात येणार आहे. ही तपासणी मोहीम सुरूच राहाणार असल्याचे डोळे यांनी सांगितले. गुरूवारी ही मोहीम अंबरनाथ, बदलापूर भागात सुरू करण्यात येणार आहे.