स्वत:च्याच अपहरणातून खंडणीचा कट फसला Print

ठाणे / प्रतिनिधी
कल्याण येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटींची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यात बांधकाम व्यावसायिकाच्या भावाचाच समावेश आहे. त्याने मेहुण्याच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा कट रचून भावाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पियुष महेश पटेल (३४) आणि त्याचा मेहुणा विजय पटेल, या दोघांना अटक करण्यात आली आहे. पियुषचा मोठा भाऊ प्रितेश पटेल हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना पियुषच्या मोबाईलवरून सलीमभाई नावाच्या व्यक्तीने एक कोटींची खंडणीसाठी धमकाविले होते. या प्रकरणी त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बाजारपेठ आणि कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून पियुष आणि विजयला अटक केली.