नवी मुंबई जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नका Print

गणेश नाईकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
खास प्रतिनिधी
राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर तयार होईल असे एकच नवी मुंबई हे शहर आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांची घरे कायम करून त्यांना चार व अडीच लाख झोपडपट्टीवासियांसाठीही चार एफएसआय आणि सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीच एफएसआय देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे गेली अनेक महिने प्रस्ताव प्रलंबित आहेत. ते त्यांनी लवकरच मंजूर करावेत, नवी मुंबईतील जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नका असा इशाराच पालकमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता दिला. त्याला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही न कळत पाठिंबा दिला. नवी मुंबईचे वन टाईम प्लॅनिंग करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची गरज असल्याचेही नाईक यांनी सांगितले.
नवी मुंबई पालिकेच्या नागरी कामांच्या शुभारंभासाठी पवार गुरुवारी नवी मुंबईत आले होते. उपमुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतरही नाईक यांनी पवार यांना नवी मुंबईत कार्यक्रमांना आवर्जून बोलाविल्याने पवार नाईकांवर बेहद्द खूष असल्याचे दिसून येत होते. यावेळी त्यांनी नाईकांच्या कामाची प्रशंसा केली. मध्यंतरी विरोधकांनी पालिकेतील सत्ताधारी पक्षावर अर्थात नाईकांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खंडन करताना पवार यांनी नाईकांची पाठराखण केली. चांगले काम करीत असताना टीका ही होणारच असे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईची सध्या लोकसंख्या बारा लाख आहे पण हे शहर तीस लाख लोकसंख्येला सामावून घेईल अशा सुविद्या येथे पालिकेने दिल्या आहेत असे सांगून नाईकांनी नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी १५ ते २० हजार कोटी रुपयांची गरज असून ते एमएमआरडीए सारख्या शासकीय संस्थाकडून कर्जरूपात घेता येईल अशी संकल्पना मांडली. त्यामुळे १५ वर्षांनंतर होणार विकास येत्या सात ते आठ वर्षांत पूर्ण करता येणार आहे. ही संकल्पना वन टाईम बजेटची नसून वन टाईम प्लॅनिंगची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेचा अर्थसंकल्प  सध्या ११०० कोटी रुपयांचा आहे तो येत्या काळात १५०० कोटी रुपयांपर्यंत जाईल. त्यातून हे कर्ज फेडता येईल असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीला श्रेय मिळू नये म्हणून नवी मुंबईतील एफएसआयला मंजुरी दिली जात नाही पण नवी मुंबई जनतेचा अंत पाहू नका असे नाईकांनी बजावले. मध्यंतरी नवी मुंबई काँग्रेसने पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल पालिकेवर मोर्चा काढला होता. त्यालाही नाईकांना उत्तर दिले. आरोप करणे सोपे आहे ते सिध्द करणे कठीण असल्याचे ते म्हणाले. शहराचा विकास हेच आमचे ध्येय असून पालिकेतील कामांची सीबीआयच काय इंटरपोलच्या वतीने चौकशी करण्यात यावी असे आव्हानही त्यांनी काँग्रेसला दिले    आहे.