सिडकोच्या बाबतीत लाचलुचपत विभागाचा कारभारही संशयास्पद? Print

विकास महाडिक
नवी मुंबईतील अनेक जमीन घोटाळ्यात पकडण्यात आलेल्या सिडको अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लाचलुचपत विभागाची असणारी बोटचेपी भूमिका आता संशयास्पद वाटू लागली असून मागील महिन्यात नेरुळ येथील एका जमीन घोटाळ्यात पकडण्यात आलेला लिपिक दयानंद तांडेल यांच्याकडे या विभागाला काहीही आढळून आलेले नाही, तर दुसरे अधिकारी रमेश सोनावणे यांच्याकडे केवळ १२ लाख रुपये मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेले सिडकोतील अधिकारी- कर्मचारी म्हणजे या विभागाला सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडय़ा वाटू लागल्या आहेत. त्यामुळे या विभागाने पकडल्यानंतरही तोऱ्यात वावरणारे अधिकारी-कर्मचारी सिडकोत असून काहीही होत नाही अशी भावना वाढीस लागली आहे. या पकडसत्रात एसीबीच्या अधिकाऱ्यांचेच चांगभलं होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सिडकोने तांडेल व सोनावणे यांना निलंबित केले आहे.
सिडकोतील कर्मचारी दयानंद तांडले व रमेश सोनावणे यांना नेरुळ येथील एका भूखंड घोटाळ्यात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी १८ जुलै रोजी अटक केली. नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. साडेबारा टक्के योजनेंतर्गत ४० मीटर भूखंडाची पात्रता असताना ठाण्यातील एका शेतकऱ्याला २३३ मीटरचा भूखंड देण्यात आला होता. यात या दोन्ही अधिकाऱ्यांनी मदत केली होती. या प्रकरणात इतर सहा सहआरोपी होते, पण त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला. तांडेल व सोनावणे यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. या काळात लाचलुचपत विभागाने तांडेल-सोनावणे जोडीच्या संपत्तीची चौकशी केली. त्यात त्यांना सोनावणे यांच्याकडून १२ लाख १३ हजार ९९६ रुपयांचा ऐवज सापडला, मात्र त्याच वेळी तांडेल यांच्याकडे काहीही सापडले नसल्याचा अहवाल सिडकोला देण्यात आला आहे. हा फार मोठा विरोधाभास असल्याचे दिसून येते. त्याबद्दल सिडकोत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिडकोने या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, दररोज सिडको प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकांकडे हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणावरून लाचलुचपत विभागाच्या सिडको ‘प्रेमा’बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. याच विभागातील एका अधिकाऱ्याने सिडकोतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘तुमची चौकशी आली आहे’ असे सांगून करोडो रुपयांची संपत्ती गोळा केली असल्याची माहिती एका सिडको अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे सिडको प्रकरणात हा विभाग संशयास्पद वागत असल्याची शंका सिडको वर्तळात व्यक्त केली जात आहे. गतवर्षी एक लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या एका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आणि दोन पिस्तुले सापडूनही त्याच्यावर म्हणावी तशी कारवाई झाली नाही. हा कर्मचारी बिनधास्त फिरत आहे. अशाच प्रकारे तीन वर्षांपूर्वी सातव्या मजल्यावरील एका महिलेसाठी २५ हजार रुपये घेणाऱ्या शिपायाला या विभागाने बेडय़ा ठोकल्या, पण ज्या महिलेसाठी ही लाच स्वीकारण्यात आली होती, तिला मात्र पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या असे समजते. या महिलेने या विभागातील अधिकाऱ्यांची बोलती बंद केल्याची नंतर चर्चा होती.
सिडकोतील कर्मचारी-अधिकारी हाताला लागणे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हाताला लागण्यासारखे आहे, अशी चर्चा याच विभागातील अधिकारी करीत असतात. त्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागायची कोणाकडे, अशी स्थिती या विभागावषियी झाली आहे. यांसदर्भात सिडकोचे कार्मिक व्यवस्थापक एस. एस. नाईक यांच्याकडे विचारणा केली असता एसीबीने दिलेल्या अहवालानुसार आम्ही त्यांचे निलंबन केले असून तसे त्यांना कळविण्यात आले आहे. या घटनेच्या वेळी आपण रजेवर होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.