ऐरोलीतील नाटय़गृहासाठी अखेर जागा सापडली Print

नवी मुंबई / प्रतिनिधी, बुधवार, २२ ऑगस्ट २०१२
वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहापाठोपाठ ऐरोली येथे नवी मुंबईतील दुसरे नाटय़गृह उभारण्याच्या प्रयत्नांनी अखेर वेग घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेने या नाटय़गृहाची उभारणी करण्यासाठी ऐरोली विभागात जागेचा शोध सुरू केला होता. अखेर सेक्टर पाच येथील सुमारे पाच हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक भूखंड यासाठी निवडण्यात आला असून नाटय़गृहासाठी हा भूखंड मिळावा, अशी मागणी महापालिकेने सिडकोकडे केली आहे. यासंबंधी एक सविस्तर प्रस्ताव नव्याने तयार करण्यात आला असून तो सिडकोकडे सादर करण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिका हद्दीतील नाटय़प्रेमींसाठी वाशी येथे विष्णुदास भावे नाटय़गृहाचा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. सिडकोने १९९७ मध्ये हे नाटय़गृह उभारले. नवी मुंबईच नव्हे तर खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल या भागांत राहणाऱ्या नाटय़प्रेमींनाही दर्जेदार नाटकांसाठी भावे नाटय़गृहाची वाट धरावी लागते. नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, दिघा या उपनगरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी भावे नाटय़गृह फारसे सोयीचे नाही. रात्री उशिरा नाटकाचे प्रयोग पाहून या उपनगरांमध्ये परतताना नाटय़प्रेमींचे हाल होतात. हे लक्षात आल्याने ऐरोली परिसरात आणखी एक नाटय़गृह उभारण्याचा प्रस्ताव आमदार संदीप नाईक यांनी महापालिकेपुढे मांडला आहे. यासाठी आवश्यक तो आमदार निधी देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
महापालिका हद्दीत दुसरे नाटय़गृह उभारणीचा प्रस्ताव महापालिकेच्या अजेंडय़ावर असला, तरी त्यासाठी आवश्यक त्या जागेचा शोध मात्र महापालिकेस लागला नव्हता. ऐरोली उपनगरात एखादी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेने मध्यंतरी सिडकोकडे केली होती. मात्र सिडकोकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद  मिळाला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या नाटय़गृहाचा प्रस्ताव रेंगाळतो की काय, असे चित्र उभे राहिले होते.
मध्यंतरी आमदार नाईक यांनी सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन सेक्टर पाच येथील सुविधा भूखंड मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. सिडकोनेही हा भूखंड देण्यासंबंधी सकारात्मक पावले उचलण्यास सुरू केल्याने सेक्टर पाच येथील सुमारे २९०० चौरस मीटरचा एक सुविधा भूखंड यासाठी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. या भूखंडास लागूनच २१०० चौरस मीटरचा आणखी एक भूखंड आहे. हा भूखंड हायटेंशन वाहिन्यांच्या खाली असल्याने त्याच्या हस्तांतरणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तरीही तोही भूखंड नाटय़गृहासाठी हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे, असे चाबूकस्वार यांनी स्पष्ट केले. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सिडकोस सादर करण्यात आला आहे, असे चाबूकस्वार यांनी स्पष्ट केले. ऐरोलीत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडावर नाटय़गृह उभारले गेले तर नवी मुंबईच नव्हे तर मुलुंड, कळवा यांसारख्या भागांत राहणाऱ्या नाटय़प्रेमींसाठीही नवा पर्याय उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला.