नवी मुंबई एमआयडीसी गेली ‘खड्डय़ात’ Print

पालिकेचे दुर्लक्ष, उद्योजक त्रस्त
विकास महाडिक, गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२

नवी मुंबई पालिका क्षेत्रात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचा मेकओव्हर करण्याची घोषणा पालिकेने केली आहे, पण हा मेकओव्हर होईल तेव्हा होईल तोपर्यंत हे रस्ते शरपंजरी पडले असून या रस्त्यांची अंत्यत वाईट दुरवस्था झाली आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे उद्योजकांच्या कारखान्यांजवळ दुर्गधी, कचरा, गढूळ पाणी साचलेले दिसून येत आहे. एमआयडीसीत रस्ते शिल्लक राहिलेले नसून आता केवळ खड्डेच आहेत अशी प्रतिक्रिया उद्योजकांनी व्यक्त केली.
एमआयडीसीने मार्च २००५ रोजी आपल्या अखत्यारीतील रस्ते नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरित केले. तेव्हापासून एमआयडीसीतील पायाभूत सुविधांची जबाबदारी पालिकेवर आहे. याच एमआयडीसीतून पालिकेला मालमत्ता व उपकराच्या पोटी सर्वाधिक कर प्राप्त होतो. या बदल्यात पालिकेची एमआयडीसीला नेहमीच सापत्नाची वागणूक मिळाली आहे. त्यामुळे एमआयडीसीत अनेक पायभूत सुविधांचा अभाव आहे. याच मुद्दय़ावरून लघुउद्योजक संघटनेने दोन्ही कर भरण्यास नकार दिला होता, पण हा वाद नंतर न्यायालयात गेला. त्या वेळी कर भरावेच लागतील असे आदेश न्यायालयाने उद्योजकांना दिले. एमआयडीसीत पायभूत सुविधा नसल्याने अनेक उद्योगांनी येथून काढता पाय घेतला आहे. त्यात पावसाळ्यात आता रस्त्यांच्या नावाने तर बोबांबोब सुरू आहे. लघुउद्योजक संघटनेचे माजी अध्यक्ष के. आर. गोपी यांच्या रबाळे येथील कारखान्यात काही दिवसांपूर्वी स्पेन येथील उद्योजक आले होते. त्या वेळी त्यांनी या पायाभूत सुविधांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांना आणणारी मर्सिडीज गाडीही खड्डय़ांतून बोटीसारखी आणावी लागली. चिखल आणि गढूळ, दरुगधीयुक्त पाणी बघून या उद्योजकांना भोवळ येणे बाकी होते. एमआयडीसीतील उंचसखल रस्त्यांमुळे सर्व रस्त्यावर पाणी साचले आहे. या पाण्याला दुर्गधी येत असून रोगराई वाढली आहे. स्पेनचे उद्योजक कारखाना बघायला येणार म्हणून दहा लाख रुपये खर्च करून कार्यालय चकाचक केले, पण रस्ते दुरुस्त कोण करणार असा सवाल गोपी यांनी उपस्थित केला आहे.
हीच स्थिती किरण चुरी यांच्या कारखान्यासमोरील रस्त्यांची आहे. त्या ठिकाणी दरुगधी जास्त असल्याने सध्या डुकरांनी हैदोस घातला आहे. या परिसरात नाक मुठीत धरून फिरावे लागत आहे. नवी मुंबईतील एकूण २४ किलोमीटर अंतराच्या एमआयडीसी विभागात कमी-अधिक प्रमाणात सारखीच स्थिती आहे. महापे येथील ए विभागात पाण्याचे तलाव झाले आहेत तर महापे सर्कलमध्ये रस्ताच गायब झाला आहे. अंतर्गत रस्त्यांना कोणी वाली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हे रस्ते बेवारस झाले आहेत. त्यात काही रस्त्यांमध्ये जलवाहिनी टाकण्यात आल्याने भरण्यात आलेले चर आता उखडले आहेत. त्यामुळे उद्योजकांची वाहने कारखान्यात पोहोचत नसल्याचे दृश्य आहे. या खराब रस्त्यांचा परिणाम उत्पन्नावर होत आहे, पण त्याचे सोयरसुतक पालिकेला नाही. या संदर्भात पालिकेचे आयुक्त भास्कर वानखेडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी खड्डय़ांचे प्रमाण जास्त असल्याचे मान्य केले. पावसाची थोडी उघडीप मिळाल्यानंतर हे खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश शहर अभियंता विभागाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ यांना या दुरवस्थेबद्दल विचारले असता त्यांनी रस्त्यांचा भाग पालिकेकडे सात वर्षांपूर्वीच हस्तांतरित करण्यात आला आहे, असे सांगितले. त्यामुळे ही सेवा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यासाठी आम्ही सर्वेक्षण करून पालिकेला वेळोवेळी अहवाल देत असतो. त्यानुसार त्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. एमआयडीसीतील या खड्डय़ांमुळे उद्योजक पुरते हैराण झाले आहेत.

इंड्रस्ट्रियल स्लम
नवी मुंबईतील औद्योगिक वसाहत ही सध्या ‘इंड्रस्ट्रियल स्लम’ झाली असून पाणी, वीज, स्वच्छता, रस्ते यांसारख्या सुविधा उद्योजकांना मिळत नाहीत. त्यामुळे या विभागाचे नाव महाराष्ट्र औद्यगिक अविकास महामंडळ असे ठेवण्याची आवश्यकता असल्याचे गोपी यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानंतर दोन महिन्यांत या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध होणार होत्या, पण त्यांचा अद्याप पत्ता नाही, असे ते म्हणाले.