एनएमएमटी भाडेवाढ चर्चेविनाच मंजूर Print

नवी मुंबईत विरोधक उरले नावापुरते..
जयेश सामंत, शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१२
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या राजकीय दबदब्यापुढे मान तुकविणाऱ्या त्यांच्या नवी मुंबईतील राजकीय विरोधकांनी येथील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा प्रश्नांवरही शेपूट घातल्याचे धक्कादायक चित्र दिसू आहे. एनएमएमटी बस भाडेवाढीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर महापालिकेत विरोधी बाकांवर बसणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी बुधवारी अक्षरश मौनव्रत धारण केल्याने नवी मुंबईकर चक्रावून गेले आहेत. याच सर्वसाधारण सभेत महापौर सागर नाईक यांनी ‘वन टाइम बजेट’ तसेच दीड एफएसआय अंमलबजावणीसारखे शहराच्या नियोजनावर दूरगामी परिणाम करणारे प्रस्तावही मांडले. त्यावरही या नगरसेवकांचे ‘मौन’ कायम होते. एकंदर शहरात समस्यांची आणि प्रश्नांची कमतरता नाही. तरीही विरोधी बाकांवर बसणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना त्याचे काही घेणे-देणे नाही, असे एकंदर चित्र आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधकांच्या या अनास्थेने तर टोकच गाठले. एनएमएमटीच्या तिकीट भाडेवाढीच्या महत्त्वाचा प्रस्ताव सभागृहापुढे होता. ही भाडेवाढ जवळपास २० ते ३० टक्क्यांच्या घरात आहे. वातानुकूलित बस प्रवासाचे भाडे तर ३० रुपयांनी वाढणार आहे. या भाडेवाढीच्या प्रस्तावावर सत्ताधारी तसेच विरोधकांकडून सविस्तर चर्चा होणे आवश्यक होते. एनएमएमटीच्या प्रवासी सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. गळक्या, सडक्या बसेसमधून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे, याचा अनुभव प्रवासी घेतच आहेत. महापालिकेच्या सभागृहात बसणाऱ्या नगरसेवकांना मात्र याविषयी काही घेणे-देणे नव्हते. महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या विजय माने यांच्याकडे आहे. माने महाशयांनी पटलावर असलेल्या एकाही विषयावर साधा ‘ब्र’देखील उच्चारला नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत आणि सिडको संचालक नामदेव भगत यांच्यासारखे अनुभवी नगरसेवक सभागृहात आहेत. त्यांनाही या विषयावर काही बोलावे असे वाटले नाही. काँग्रेस नगरसेवक संतोष शेट्टी यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा विषय पटलावर होता. या ही विषयावर एकही नगरसेवक बोलला नाही. महापालिकेचा अर्थसंकल्प यापुढे एकदाच मांडला जावा, यासंबंधी ‘वन टाइम बजेट’चा अजब प्रस्ताव आयुक्त भास्कर वानखेडे यांनी केवळ माहितीसाठी सभागृहापुढे सादर केला. खरे तर यासंबंधी धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित होते. एवढय़ा महत्त्वाच्या प्रस्तावावरही सर्वच पक्षाचे नगरसेवक केवळ हास्यविनोद करीत बसले. काँग्रेस-शिवसेना नगरसेवकांची उपस्थिती केवळ हात वर करण्यापुरती होती. त्यामुळे महापालिकेत विरोधक उरले नावापुरते, असाच सूर बुधवारच्या सभेनंतर होता.यासंबंधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सभागृहात राष्ट्रवादीची दादागिरी चालते. त्यामुळे महत्त्वाचे प्रस्ताव चर्चा होऊ न देताच मंजूर केले जातात, असे सांगितले. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नगरसेवकानेही हाच मुद्दा अधोरेखित केला.