नवी मुंबईत मीडिया फेस्टिवल -महापौर नाईक Print

खास प्रतिनिधी
 प्रशिक्षित पत्रकार तयार व्हावेत यासाठी पालिकेच्या वतीने दरवर्षी मीडिया फेस्टिवल भरविण्यात येईल अशी माहिती नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी दिली. नवी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि प्रगती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुईनगर येथे नुकताच पत्रकरिता प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ महापौर नाईक यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक काशिनाथ पाटील, कवी, लेखक शंकर पंडित आणि पुराभिलेख विभागाचे माजी संचालक डॉ. भास्कर धाटावकर उपस्थित होते. पत्रकार हे समाजातील डिटेक्टिव आहेत. समाजाचे चित्र मांडण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे प्रशिक्षित पत्रकार तयार व्हावेत यासाठी पालिकेच्या वतीने दरवर्षी मीडिया फेस्टिवल भरविण्यात येईल यंदा नोव्हेंबर महिन्यात हा सोहोळा पार पडेल असेही महापौरांनी सांगितले. . चांगले पत्रकार तयार होण्यासाठी त्यांना प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. त्यामुळे पत्रकार प्रशिक्षणाच्या शाखा केवळ जुईनगरमध्ये मर्यादित न राहता त्या संपूर्ण शहरात सुरू झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली. बातमीचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे, असा सल्ला कवी पंडित यांनी दिला, तर सर्व चौकशीअंती बातमी देणे योग्य असल्याचे मत डॉ. धाटावकर यांनी व्यक्त केले. फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण राणे यांनी, अभ्यासक्रमात प्रत्यक्ष कार्यानुभवावर भर दिला जाईल असे सांगितले.