राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला खुनाच्या गुन्ह्य़ात अटक Print

खास प्रतिनिधी / नवी मुंबई
नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवींद्र इथापे याला त्याच्या मूळ गावातील एका चोराला ठार मारल्याच्या गुन्ह्य़ात जुन्नर तालुका पोलिसांनी अटक केली. इथापे यांच्या पत्नी विद्यमान सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. या गुन्ह्य़ात ते तीन महिने फरार होते.
जुन्नर तालुक्यातील म्हसवडी गावामधील मळगंगा मंदिरातील कळस आणि घंटा तीन महिन्यापूर्वी चोरीला गेल्याने ग्रामस्थांनी महेंद्र नामदेव जाधव या तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर या तथाकथित चोराचा मृत्यू झाला. ही मारहाण इथापे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप मयत जाधवच्या भावाने केला आहे. त्यामुळे घारगाव पोलीस इथापे यांच्यासह १६ जणांचा शोध घेत होते.
सोमवारी इथापे नाशिक-पुणे महामार्गावरील बोटा शिवारातील कामत हॉटेलमध्ये असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना अटक केली. इथापे यांना न्यायालयाने एक सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी दिली. इथापे गेली तीन महिने फरार असल्याचे पोलीस सांगत असले तरी ते नवी मुंबईत बिनधास्तने वावरत होते. नवी मुंबई पालिकेतील या तिसऱ्या नगरसेवकाला अटक झाली आहे.