पायाभूत सुविधांसाठी बिल्डरांचे सिडकोला साकडे Print

खास प्रतिनिधी / नवी मुंबई ,३१ ऑगस्ट २०१२
रायगड जिल्ह्य़ातील खारघर, पनवेल, कामोठे, द्रोणागिरी, तळोजा, पाचनंद, उलवा या भागात सिडकोने लवकरात लवकर रस्ते, पाणी, वीज यासारख्या पायभूत सुविधा द्याव्यात यासाठी नवी मुंबई बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर असोशिएशनने सिडकोला साकडे घातले आहे. त्यावरून सिडकोने नुकतीच उलवा भागाची पाहणी करून सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे.
रायगड जिल्ह्य़ातील पनवेल व उरण तालुका झपाटय़ाने विकसित होत आहे. या तालुक्यातील अर्धा भाग सिडकोच्या अखत्यारीत येत असल्याने येथे नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. सिडकोने खारघरमध्ये स्पॅगेटी, सेलिब्रेशन, यासारखी गृहसंकुले उभारली आहेत तर उलवा येथे उन्नती गृहसंकुल बांधून तयार आहे. या उपनगरात अनेक समस्या आहेत पण सिडकोने वितरित केलेल्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंड परिसरात या उपनगरांपेक्षा जास्त समस्यांनी डोके वर काढले असून नागरिक या ठिकाणी राहण्यास येण्यास कचरत आहेत.
त्यामुळे बिल्डरांच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांना भेटून येथील समस्या सांगितल्या. त्यानुसार सिडकोच्या अभियंत्यानी व बिल्डर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नकुतीच या अविकसित भागांची पाहणी केली. त्यानुसार उलवा सेक्टर २३ येथे लवकरच पायाभूत सुविधा उभारण्यात येतील, असे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले आहे.
याशिवाय सेक्टर २,३,५, या भागातही नागरी सुविद्यांचा अभाव आहे. त्या पूर्ण करण्याचे आश्वासन सिडकोने दिल्याचे असोशिएशनचे अध्यक्ष रमेशभाई शाह यांनी सांगितले.