नवी मुंबईत महापालिकेची आणखी चार आरोग्य केंद्रे Print

नेरुळ, कुकशेत, कोपरखैरणे, नोसील येथे सुरू होणार
नवी मुंबई/ प्रतिनिधी - गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२
 नवी मुंबई महापालिकेने आपल्या आरोग्य व्यवस्थेचा आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आणखी चार नवीन आरोग्य केंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावास महासभेत मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ५० हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य केंद्र असे निकष ठरविण्यात आले आहेत. यानुसार महापालिकेने आतापर्यंत २० केंद्रे सुरू केली आहेत. हे निकष पूर्ण करण्याकरिता नेरुळ (सेक्टर ४८), कुकशेत, कोपरखैरणे
(सेक्टर ४) आणि नोसील नाका (घणसोली) या ठिकाणी आणखी चार आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेने स्थापनेपासून वाशी येथील ३०० खाटांचे एक रुग्णालय, चार माता बाल रुग्णालये तसेच १३ आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. नवी मुंबईचा भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन महापालिकेने मध्यंतरी ऐरोली आणि नेरुळ अशा दोन ठिकाणी प्रत्येकी १०० खाटांची दोन नवी रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त शहर अभियंता विभागामार्फत सरू असलेल्या या रुग्णालयांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तरीही नागरी आरोग्य केंद्रांची संख्या कमी असल्याचे लक्षात येताच मध्यंतरी आणखी सात केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या निकषाप्रमाणे अजूनही शहरात चार आरोग्य केंद्रांची कमतरता आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचा प्रामुख्याने वापर झोपडपट्टी तसेच ग्रामीण भागात होतो. शहरी भागात आरोग्य केंद्राचा प्रभावी वापर होत नाही, असा अनुभव आहे. तरीही केवळ शासनाचे निकष पूर्ण करण्याकरिता वाशी सेक्टर-२ या पूर्णत: शहरी परिसरात महापालिकेने आरोग्य केंद्र सुरू करून सर्वानाच धक्का दिला आहे. या पाश्र्वभूमीवर आणखी चार नवी केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव नुकताच महासभेत मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर सागर नाईक यांनी पत्रकारांना दिली. या चार नव्या केंद्रांमुळे घणसोली, राबाडा, ऐरोली, कोपरखैरणे या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या नागरी आरोग्य केंद्रांमधील वाढीव लोकसंख्येचे पुनर्वितरण करता येऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला. या चार आरोग्य केंद्रांच्या उभारणीसाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अभियंता विभागातील सूत्रांनी दिली.  नोसील नाका येथे आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी भूखंड ऊपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी भाडय़ाच्या जागेत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.