नवी मुंबईत १५ हजारांहून अधिक खड्डे Print

महासभेत रणकंदन
प्रतिनिधी, गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२

नवी मुंबई
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील जवळपास सर्वच उपनगरांमध्ये सुमारे १५ हजारांहून अधिक खड्डे पडल्याची कबुली मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अभियंता विभागामार्फत देण्यात आली. शहरात मलनिस्सारण तसेच पाण्याच्या वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची प्रभावीपणे भरणी झालेली नाही. त्यामुळे पावसाचा जोर वाढताच रस्ते खचू लागतात आणि खड्डे पडतात, अशी कबुली यावेळी देण्यात आली.


दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमधील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्यासारखी परिस्थिती आहे. महापालिकेच्या अभियंता विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू िशदे यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयी लक्षवेधी सूचना मांडली. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला शहरातील खड्डय़ांविषयी लक्षवेधी मांडावी लागल्याने विरोधी पक्षातील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी यावेळी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी यावेळी सभागृहात बॅनर फडकावून रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांचे सचित्र दर्शनच सभागृहाला घडविले. ऐरोली- वाशी- बेलापूर या उपनगरांच्या त्रिकोणात सुमारे १५ हजारांहून अधिक खड्डे पडल्याचा धक्कादायक आरोपही भगत यांनी यावेळी केला. यावेळी विरोधी पक्षनेते विजय माने यांनीही अभियांत्रिकी विभागाच्या हलगर्जीपणाचा पाढा सर्वासमोर वाचला. याविषयावर खुलासा करताना महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी शहरात मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडल्याची कबुली दिली. मुख्य रस्त्यांवर पडणारे खड्डे लक्षात घेऊन महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रोड व्हिजन हा कार्यक्रम हाती घेतला. या माध्यमातून शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांना काँक्रिटचा मुलामा देण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून शहरात मलनिस्सारण तसेच पाण्याच्या नव्या वाहिन्या टाकण्याची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. या वाहिन्या टाकण्यासाठी अंतर्गत रस्ते खोदण्यात आले. पावसाळ्यापूर्वी हे रस्ते बुजविण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले. मात्र, खड्डे बुजविताना आवश्यक त्या पद्धतीने भरणी केली गेली नाही. त्यामुळे पावसाचा जोर वाढताच पुन्हा खड्डे पडतात, अशी कबुली डगावकर यांनी यावेळी दिली. येत्या १७ सप्टेंबपर्यंत सर्व खड्डे बुजविले जातील, असे आश्वासनही डगावकर यांनी यावेळी दिले.