नवी मुंबईतील परिवहन सेवा महागली Print

खास प्रतिनिधी ,२४ सप्टेंबर २०१२
वाढती महागाई, डिझेल-गॅसची दरवाढ, सहाव्या वेतन आयोगामुळे वाढलेला कर्मचाऱ्यांवरील खर्च आदी कारणांमुळे नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) ऐन गणेशोत्सव काळात सोमवार मध्यरात्रीपासून बस तिकीट दरात भाडेवाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. सामान्य प्रवाशांच्या खिशाला चाट देणारी ही भाडेवाढ कमीत कमी एक रुपया, तर जास्तीत जास्त सहा रुपयांपर्यंत राहणार आहे. उपक्रमाने सुरू केलेल्या वातानुकूलित बससाठी तर ही वाढ पाच रुपयांच्या टप्प्यात असल्याने यापूर्वी या बसमधील वांद्रेपर्यंत होणारा सुखकारक   प्रवास आता थेट ३७ रुपये मोजून करावा लागणार आहे.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या इंधन दरवाढीचा या भाढेवाढीत विचार करण्यात आलेला नाही. यापूर्वी ही दरवाढ दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. शुक्रवारी परिवहन प्राधिकरणाने या दरवाढीला मंजुरी दिली.
या दरवाढीत पहिल्या टप्प्यासाठी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दुसऱ्या टप्प्यासाठी एक रुपया वाढविण्यात आला असून, नंतरच्या टप्प्यांसाठी टप्प्याटप्प्याने दोन ते सहा रुपये दरवाढ करण्यात आली आहे. परिवहन उपक्रमाच्या ३० व्होल्व्हो बस आहेत. या बसेस विशेषत्वे करूनमुंबईत जातात. वातानुकूलित असणाऱ्या या बसेससाठी थेट पाच रुपये वाढविण्यात आले आहेत. परिवहन उपक्रमाच्या या दरवाढीचा फटका दोन लाख ३० हजार प्रवाशांना बसणार आहे. यापूर्वीची दरवाढ ६ ऑगस्ट २०१० रोजी करण्यात आली होती.