नवी मुंबईतील परिवहन सेवा महागली Print

किमान एक रुपया, कमाल सहा रुपये भाडेवाढ * पहिल्या टप्प्याचे तिकीट दर कायम * दरवाढीचा फटका दोन लाख ३० हजार प्रवाशांना * वातानुकूलित बसेससाठी थेट पाच रुपये वाढ
खास प्रतिनिधी ,२४ सप्टेंबर २०१२
alt

वाढती महागाई, डिझेल-गॅसची दरवाढ, सहाव्या वेतन आयोगामुळे वाढलेला कर्मचाऱ्यांवरील खर्च आदी कारणांमुळे नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) ऐन गणेशोत्सव काळात सोमवार मध्यरात्रीपासून बस तिकीट दरात भाडेवाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. सामान्य प्रवाशांच्या खिशाला चाट देणारी ही भाडेवाढ कमीत कमी एक रुपया, तर जास्तीत जास्त सहा रुपयांपर्यंत राहणार आहे. उपक्रमाने सुरू केलेल्या वातानुकूलित बससाठी तर ही वाढ पाच रुपयांच्या टप्प्यात असल्याने यापूर्वी या बसमधील वांद्रेपर्यंत होणारा सुखकारक प्रवास आता थेट ३७ रुपये मोजून करावा लागणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या इंधन दरवाढीचा या भाढेवाढीत विचार करण्यात आलेला नाही. यापूर्वी ही दरवाढ दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. शुक्रवारी परिवहन प्राधिकरणाने या दरवाढीला मंजुरी दिली.
२३ जानेवारी १९९६ रोजी (१६ वर्षांपूर्वी) २५ गाडय़ांच्या ताफ्यासह सुरू करण्यात आलेल्या नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमात आजमितीस ३३७ बस आहेत. संपूर्ण नवी मुंबई, मुलुंड, वांद्रे, बोरिवली, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, उरण अशा ३९ मार्गावर या बसेसचे जाळे विणण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत डिझेलच्या दरात झपाटय़ाने झालेली वाढ, सीएनजी गॅसच्या वाढत्या किमती तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन, गाडय़ांचे सुटे भाग, टायर, विमा यासारख्या बाबींवर वाढणारा खर्च यामुळे परिवहन उपक्रमाला जमा आणि खर्चाचा ताळेबंद आखणे डोईजड झाले होते. त्यामुळे उपक्रम महिन्याला एक कोटी ४७ लाख रुपये तोटय़ात जाऊ लागला होता. यातून बाहेर पडण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्याशिवाय उपक्रमाला दुसरा पर्याय नव्हता. ऑगस्ट महिन्यात पलिकेच्या सर्वसाधारण सभेने या दरवाढीला मान्यता दिली. त्यानंतर हा प्रस्ताव परिवनहन उपक्रमाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला शुक्रवारी हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून तिकीट दरात वाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी परिवहन उपक्रमाने सुरू केली असून, ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे मत उपक्रमाचे व्यवस्थापक जी. सी. मंगळे यांनी सांगितले.
या दरवाढीत पहिल्या टप्प्यासाठी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दुसऱ्या टप्प्यासाठी एक रुपया वाढविण्यात आला असून, नंतरच्या टप्प्यांसाठी टप्प्याटप्प्याने दोन ते सहा रुपये दरवाढ करण्यात आली आहे. परिवहन उपक्रमाच्या ३० व्होल्व्हो बस आहेत. या बसेस विशेषत्वे करूनमुंबईत जातात. वातानुकूलित असणाऱ्या या बसेससाठी थेट पाच रुपये वाढविण्यात आले आहेत. परिवहन उपक्रमाच्या या दरवाढीचा फटका दोन लाख ३० हजार प्रवाशांना बसणार आहे. यापूर्वीची दरवाढ ६ ऑगस्ट २०१० रोजी करण्यात आली होती.