नवी मुंबईतील सफाई, वाहतुकीच्या कंत्राटांना बडय़ा रकमांची झालर Print

कचऱ्यातून निघतोय संशयाचा धूर
* कचरा वाहतूकीचे कंत्राट २३४ कोटींचे
* यांत्रिक सफाईवर ७० कोटींचा दौलतजादा
* शहरातील सफाईसाठी जुन्या ठेकेदारांना ठेंगा   
जयेश सामंत - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

नवी मुंबईतील कचरा वाहतुकीसाठी सुमारे २३४ कोटी रुपयांचा तयार करण्यात आलेला वादग्रस्त प्रस्ताव येत्या काळात महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षांत कचरा वाहतुकीवर झालेला खर्च आणि नव्याने तयार करण्यात आलेला या कामाच्या प्रस्तावातील तफावतीमुळे शहरातील कचरा येत्या काळात पेटण्याचीच शक्यता अधिक आहे. वानखेडे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच महापालिका रुग्णालयातील साफसफाईचे सुमारे १३ कोटी रुपयांचे कंत्राट बिवीजीनामक कंपनीला विनानिविदा देण्याचा वादग्रस्त निर्णय प्रशासनाने घेतला. नवी मुंबईतील कचरा वाहतुकीचा अक्षरश: बोजवारा उडाला असताना अ‍ॅन्थोनी कंपनीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची नामुष्कीही प्रशासनावर ओढवली आहे. या पाश्र्वभूमीवर २३४ कोटी रुपयांच्या कचरा वाहतुकीच्या वादग्रस्त प्रस्तावाच्या जोडीला ऐरोली आणि बेलापूर अशा दोन परिमंडळ क्षेत्रात कचरा सफाईसाठी सुमारे ६० कोटींपेक्षा अधिक रकमेचे नवे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया महापालिका वर्तुळात सुरू असून कचऱ्यातील या अनागोंदीमुळे वानखेडे आणि त्यांचे प्रशासन येत्या काळात गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनियमितता असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या साफसफाईच्या नावाने तर महापालिकेतील पैशांची अक्षरश: उधळपट्टी सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या असून, शहरातील कचरा वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला २३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव सर्वावर कडी करणारा ठरेल, अशी शक्यता आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे. नवी मुंबई महापालिका रुग्णालयात सफाईसाठी १३ कोटी रुपयांच्या कंत्राटास विनानिविदा मुदतवाढ देण्याचा धक्कादायक निर्णय महापालिकेत यापूर्वीच घेण्यात आला आहे. या कंत्राटाविरोधात मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठाविण्याची भाषा करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत पुढे मात्र चिडीचूप झाले. हे वादग्रस्त कंत्राट मंजूर होत असताना शहरातील कचरा वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजल्याचे चित्र होते. मेसर्स अन्थोनी या कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल, अशा मोठमोठय़ा घोषणा सभागृहात अनेकदा करण्यात आल्या. प्रत्यक्षात याच कंत्राटदारास सुमारे दीड कोटी रुपयांची वाढीव रक्कम देऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. हे करत असताना गेल्या वर्षीपर्यंत अवघ्या ८५ कोटींत होणारे सफाईचे काम चक्क २३४ कोटी रुपयांपर्यत फुगविण्यात आल्याने आयुक्त वानखेडे यांच्या प्रशासनाची कार्यपद्धती नव्या वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कामाच्या जोडीला ऐरोली आणि बेलापूर अशा दोन विभागांत सफाईसाठी दोन नवे कंत्राट काढण्याचे बेतही महापालिकेत आखले जात आहेत. सध्या शहरातील साफसफाई ८१ कंत्राटदारांमार्फत केली जाते. यामध्ये सुमारे ७० कंत्राटदार प्रकल्पग्रस्त कुटुंबातील असून त्यांची कामे व्यवस्थित सुरू आहेत. असे असताना ही प्रक्रिया मोडीत काढून अवघी दोन कंत्राटे काढायची आणि ठराविक कंत्राटदारांवर दौलतजादा करायची, असे प्रयत्न शहरातील एका बडय़ा नेत्याच्या आशीर्वादाने महापालिका वर्तुळात सुरू आहेत.