पालकमंत्र्यांचे ओएसडी काँग्रेसच्या निशाण्यावर Print

नवी मुंबई महापालिकेत आरोपांच्या फैरी
 नवी मुंबई/प्रतिनिधी
पालकमंत्री गणेश नाईक यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) संतोषसिंह परदेशी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या व्यवस्थापकांसाठी राखीव  सदनिकेत परदेशी राहात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने स्थायी समिती सभेत केला. परदेशी महापालिकेच्या उपकर विभागात उपायुक्तपदी असताना काही प्रकरणे चुकीच्या पद्धतीने हाताल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. एनएमएमटीचे  व्यवस्थापक मांगळे मुंबईहून कार्यालयात येतात, मात्र परदेशी यांची सोय लावण्यासाठी त्यांना खास निवासाची व्यवस्था केली असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी  केला.
नवी मुंबई पालिकेत उपायुक्त असल्यापासून  परदेशी आणि काँग्रेस मधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांत बेबनाव आहे. अतिक्रमण विभागाचा कार्यभार परदेशी यांच्याकडे असताना रबाळे भागातील काँग्रेसच्या संबंधित असलेल्या एका कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली. तेव्हापासून काँग्रेस आणि परदेशी यांचे बिनसले. याप्रकरणी परदेशी यांच्या बदलीचे आदेश मंत्रालयातून निघाले होते. तत्कालीन स्थायी समिती सभापती संदीप नाईक यांच्या मर्जीतील मानले जाणारे परदेशी यांना पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नेमण्यात आले. काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांना ही चपराकच होती. यानंतरही परदेशी यांच्यावरील काँग्रेसी नेत्यांचा राग अजून गेला नसल्याचे स्थायी समिती सभेत दिसले.
पालिकेच्या उपकर विभागात अनागोंदी आहे.परदेशी यांच्याकडे उपकर विभागाची जबाबदारी असताना त्यांची चौकशी सुरू झालेल्या चौकशीचे पुढे काय झाले, असा सवाल त्यांनी यांनी उपस्थित केला.
एनएमएमटी व्यवस्थापकांसाठी राखीव असलेली बेलापूर येथील सदनिका परदेशी वापरत असून हे बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला. दरम्यान, याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊनच चर्चा केली जाईल, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती संपत शेवाळे यांनी  दिली.