शीळ डंपिंग ग्राऊंडने केली शिवसेना नेत्यांची कोंडी Print

सुभाष भोईरांच्या विरोधामुळे पंचाईत

जयेश सामंत, शुक्रवार,५ ऑक्टोबर २०१२
ठाणे, कळवा, मुंब्रा या परिसरांतून दररोज निघणाऱ्या शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गेली अनेक वर्षे जागेच्या (डंपिंग ग्राऊंड) शोधात भटकणाऱ्या ठाणे महापालिकेस अखेर शीळ भागातील बंद दगडखाणीची भली मोठी जमीन पदरात पडण्याचा मार्ग मोकळा झाला खरा, मात्र या मुंब्य्रातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष भोईर यांनी या नियोजित क्षेपणभूमीस आतापासूनच टोकाचा विरोध सुरू केल्याने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते दुहेरी कोंडीत सापडले आहेत.

ठाण्यात इंधनाचे दर स्वस्त झाल्याने खुशीत असलेल्या शिवसेना नेत्यांना डंिपग ग्राऊंडसाठी जमीन उपलब्ध होताच हर्षवायू होण्याचे बाकी राहिले होते. कचऱ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. त्यामुळे सत्ताधारी या नात्याने या निर्णयाचे श्रेय घ्यायला हवे, असे ठाणे शिवसेनेतील एका मोठय़ा गटाचे म्हणणे आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेले माजी आमदार सुभाष भोईर यांनी शीळ येथे डंिपग ग्राऊंड उभे राहू नये, यासाठी आंदोलनाची भाषा सुरू केल्याने सेना नेत्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.  
राज्यातील मोठय़ा महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेचे स्वत:चे असे डंिपग ग्राऊंड नाही. त्यामुळे दररोज निघणाऱ्या सुमारे ७०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट नेमकी कोठे लावायची, असा प्रश्न नेहमीच महापालिकेच्या घनकचरा विभागापुढे असतो. ठाणे महापालिकेस घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी डायघर येथे सुमारे १९ हेक्टर क्षेत्रफळाचा भलामोठा भूखंड २००४ मध्ये शासनाकडून मिळाला. मात्र या भागातील नागरिकांचा टोकाचा विरोध असल्याने हा प्रकल्प उभा करणे अद्याप महापालिकेस जमलेले नाही. स्वत:ची अशी क्षेपणभूमी नसल्याने महापालिका सध्या मुंब्रा भागात असलेल्या खर्डी गावालगत खासगी मालकीच्या जागेवर त्या भागातील जमीनमालकांच्या परवानगीने कचरा नेऊन टाकते. या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याच्या तक्रारी असून स्थानिक ग्रामस्थांचा विरोध मोडून काढताना महापालिकेस अक्षरश: नाकीनऊ आले आहेत. या प्रकरणी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांविरोधात यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हेही दाखल केले आहेत. मध्यंतरी ठाणे महापालिकेने नवी मुंबई महापालिकेस त्यांच्या क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यास परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र नवी मुंबईने ही परवानगी नाकारल्याने शीळ भागात बंद खदाणी तसेच दगडखाणींची जागा कचरा टाकण्यासाठी द्यावी, अशी मागणी ठाणे महापालिकेने शासनाकडे केली होती. गेली अनेक वर्षे याविषयी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते.
राज्य सरकारच्या महसूल विभागाने शीळ भागातील ही जागा अखेर ठाणे महापालिकेस देण्याचा निर्णय घेतल्याने कचरा विल्हेवाटीसाठी स्वत:च्या मालकीची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वरवर पाहाता हा ऐतिहासिक निर्णय असल्याने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते सध्या खुशीत आहेत. मात्र मुंब्रा भागातील सेना नेते सुभाष भोईर यांच्या बंगल्यामागेच ही जागा येत असल्याने त्यांनी येथील नागरिकांचा हवाला देत शीळ डंिपग ग्राऊंडला विरोध सुरू केल्याने ठाण्यातील शिवसेना नेते गांगरले आहेत. ठाणे महापालिकेचे स्वत:चे डंिपग ग्राऊंड उभे राहात असेल तर सत्ताधारी म्हणून त्याचे श्रेय आपसूकच शिवसेनेच्या पदरात पडणार आहे. मात्र भोईर यांनी जाहीर विरोध सुरू केल्याने शिवसेनेचे जिल्हा संपर्कनेते आमदार एकनाथ िशदे सध्या दुहेरी कोंडीत सापडले आहेत.

या प्रकरणी महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शीळ येथील जागा डंिपग ग्राऊंडसाठी मिळाली असून सुभाष भोईर यांचा त्यास विरोध असल्याचे मान्य केले. यासंबंधी नेमकी कोणती भूमिका घ्यायची याचा विचार शिवसेनेच्या स्तरावर सुरू असून शीळ पट्टय़ातील नागरिकांच्या भावनाही लक्षात घ्यायला हव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. तरीही यासंबंधी नेत्यांसोबत सारासार चर्चा करून एकनाथ िशदे योग्य ती भूमिका जाहीर करतील, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.