नवी मुंबईला लाभतोय आकर्षक उद्यानांचा साज Print

वाशी आणि नेरुळ येथे दोन नवे थीम पार्क
*     चिल्ड्रन पार्क शुभारंभाच्या प्रतीक्षेत
*     तलावांनाही नूतनीकरणाचा साज
*     मनोरंजन, पर्यटन केंद्र विकसित करण्याचा प्रयत्न
नवी मुंबई, / प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
रॉक गार्डन, चिल्ड्रन पार्क, धारण तलावांचा विकास करत शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये नागरिकांसाठी मनोरंजनाची आणि पर्यटनाची नवी केंद्रे विकसित करण्याचा सपाटा सध्या नवी मुंबई महापालिकेने लावला असून येत्या काळात वाशी आणि नेरुळ येथे सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च करून ‘थीम पार्क’च्या धर्तीवर दोन नवी उद्याने विकसित करण्याचा निर्णय अभियंता विभागाने घेतला आहे. वाशी सेक्टर आठ येथील सिडकोकालीन सीशोअर उद्यानाचा पूर्णत: कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्यास मिनी-सीशोअरसोबत वाशीकरांसाठी आणखी एक मनोरंजनाचे केंद्र उपलब्ध होऊ शकणार आहे. हे प्रकल्प उभे करत असताना शहरात आकर्षक आणि लक्षवेधी अशा उद्यानांचे जाळे उभारण्याचा अभियंता विभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी ‘वृत्तान्त’ला दिली.
नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने शहरातील प्रत्येक उपनगरात उद्यानांसाठी आरक्षण ठेवले. वाशी, नेरुळ, सीबीडी, ऐरोली यांसारख्या उपनगरांमध्ये सर्वाधिक उद्याने विकसित करून नागरिकांसाठी मोकळ्या जागा आरक्षित ठेवण्याकडे सिडकोचा सुरुवातीला कल राहिला. नवी मुंबई महापालिकेनेही या उद्यानांच्या देखभालीकडे विशेषत्वाने लक्ष दिले असून येत्या काळात शहरात अद्ययावत अशा उद्यानांच्या उभारणीचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी या उद्यानांपलीकडे नवी मुंबईची ओळख ठरेल असे पर्यटन केंद्र शहरात नाही, अशी ओरड नेहमीच सुरू असते. हे लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून वैविध्यपूर्ण आणि आकर्षक उद्यानांची उभारणी करत भलेमोठे पार्क तयार करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
नेरुळ दारावे भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक संदीप सुतार यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेले रॉक गार्डन हा याच प्रयत्नांचा भाग असून नवी मुंबईतील नागरिकांसाठी हे उद्यान सध्या आकर्षणाचा विषय ठरले आहे. मोठमोठय़ा आकाराच्या दगडांमधून साकारण्यात आलेली शिल्पे आणि मोहक रचना यामुळे आबालवृद्धांची मोठी गर्दी या ठिकाणी होताना दिसत आहे. रॉक गार्डनच्या सोबतीला महापालिकेने नेरुळ पश्चिमेकडे चिल्ड्रन पार्कची उभारणी केली असून नवी मुंबईतील हा सर्वात मोठा पर्यटन प्रकल्प आहे. सुमारे १० कोटींहून अधिक रक्कम खर्च करून उभारण्यात येणारे हे पार्क शीव-पनवेल महामार्गास लागूनच उभारण्यात आल्याने भविष्यात शहरातील एक मोठे पर्यटन केंद्र म्हणून ते विकसित होऊ शकेल, असा महापालिकेचा दावा आहे. कोपरखैरणे येथे होल्डिंग पॉडचा विकास करून या ठिकाणी आकर्षक पर्यटन स्थळ नुकतेच सुरू करण्यात आले आहे. अशा प्रकारे शहरातील वेगवेगळ्या होल्डिंग पॉडचा विकास करण्याचा महापालिकेचा मानस असून काही तलावांमध्ये खारफुटीचे अडथळे उभे राहिल्याने त्यासंबंधी पर्यावरण विभागाच्या मंजुरीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. असे वैविध्यपूर्ण प्रकल्प राबविताना वाशी सेक्टर आठ येथील खाडीकिनारी लागून असलेले शहरातील सर्वात जुने उद्यान विकसित करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.
वाशीकरांसाठी मनोरंजनाचे पहिले ठिकाणी म्हणून या भल्यामोठय़ा उद्यानाकडे पाहिले जाते. हे मोठे प्रकल्प हाती घेत असताना नेरुळ सेक्टर १९ येथे थीम पार्क विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून या पार्कमध्ये अ‍ॅम्पी थिएटर, ओपन जिम्, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारले जाणार आहे. शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या उद्यानांच्या जोडीला अशी मोठाले पार्क उभारण्याचा महापालिकेचा विचार असून येत्या काळात इतरही उपनगरांमध्ये असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती डगावकर यांनी दिली.