नवी मुंबईत कचरा पेटला Print

काँग्रेसच्या निशाण्यावर महापौर आणि आयुक्त
नवी मुंबई / प्रतिनिधी - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
 नवी मुंबई महापालिकेत साफसफाई ठेक्यांच्या नावाने सुरू असलेल्या सावळागोंधळामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि शिवसेना सदस्यांनी एकत्र येत महापौर सागर नाईक यांच्यासह महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांची मंगळवारी जोरदार कोंडी केली. शहरात यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याचा सुमारे ७४ कोटी रुपयांचा ठेका देताना आयुक्त वानखेडे यांनी सर्व नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांची बदली करावी, अशी जोरदार मागणी केली. वानखेडे म्हणजे राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर आहेत, अशी टीका करीत त्यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार अशी माहिती यावेळी ज्येष्ठ नगरसेवक तसेच सिडकोचे संचालक नामदेव भगत यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्वाच्या विषयांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलू द्यायचे नाही, असा शिरस्ताच महापौरांनी सुरू केला असल्याचे मंगळवारी झालेल्या महासभेत पुन्हा एकदा दिसून आले. पाम बिच तसेच ठाणे-बेलापूर रस्त्यावर यांत्रिकी पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या साफसफाईच्या कामात ७४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ भगत यांनी लक्षवेधी सूचना मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांना लक्षवेधीला फाटा देत विषयपत्रिकेवरील विषयांना सुरूवात केली. यावेळी राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर होता. याविषयावर बोलू द्यावे अशी मागणी शिवसेना तसेच काँग्रेस सदस्यांनी केली. मात्र, याविषयावरही बोलणे टाळून महापौरांनी हा विषय संख्याबळाच्या जोरावर फेटाळला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग करून सभागृहाबाहेर ठिय्या मांडला.
महापालिकेच्या रुग्णालयात १५ कोटी रुपयांचे साफसफाईचे कामाला विनानिविदा मुदतवाढ देण्याचा निर्णय तसेच शहरातील कचरा वाहतुकीचे २३४ कोटी रुपयांचे काम चुकीच्या पद्धतीने काढण्यात आले असून वानखेडे यांचे प्रशासन नियमबाह्य़ पद्धतीने काम करत असल्याचा आरोप भगत यांनी केला. याप्रकरणी काँग्रेस-शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून वानखेडे यांच बदलीची मागणी करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामात कोणतेही चुकीचे काम झालेले नाही, असा दावा महापौर सागर नाईक यांनी केला. प्रसारमाध्यमांना हाताशी धरून केवळ स्टंट करायचे आणि महापालिकेच्या सभागृहात गोंधळ घालायचा, असे उद्योग विरोधी पक्षांकडून सुरू आहेत, असेही महापौर म्हणाले.     
महापालिकेत महापौर तसेच आयुक्तांना टीकेचे लक्ष्य करताना काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावरही टीकेची झोड उठवली. महापालिकेत राष्ट्रवादीचे नेते व्हिलनच्या भूमिकेत वावरत असून हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे, असा आरोप नामदेव भगत यांनी केला. ज्या पुलावरुन दिवसाला १०० गाडय़ासुद्धा जात नाहीत, अशा उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला, असा आरोप भगत यांनी केला. बेलापूर येथील रेतीबंदर भागात काचेचा महाल कुणी बांधला आहे, तो अधिकृत आहे का, असे काही सवालही भगत यांनी यावेळी उपस्थित केले. महापालिकेच्या पैशावर राष्ट्रवादीचे नेते मोठमोठय़ा गाडय़ा मिरवित आहेत, असा खळबळजनक आरोपही भगत यांनी केला. दरम्यान, भगत यांनी पुरावा देऊन बोलावे, असे आव्हान महापौर सागर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. असे बेछूट आरोप पत्रकारांशी छापू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.