नवी मुंबईकरांना वीज बिलांचा शॉक Print

विकास महाडिक
वीज नियामक आयोगाने काही पैशांत वीज बिल वाढविण्याच्या दिलेल्या संमतीचा फायदा वीज वितरण कंपनीने चांगलाच घेतला असून नवी मुंबईत काही ठिकाणी पैशाचे रूपांतर रुपयांत करून पाच हजारांपासून वीस हजारांपर्यंत ग्राहकांना बिले लागू केली. यामुळे ही वाढीव बिले बघून मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळे पांढरे झाले आहेत.
वीजनिर्मितीवर होणारा खर्च भरून काढण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाने एक ऑगस्टपासून युनिटमागे काही पैसे वीज बिल वाढविण्याची परवानगी वीज वितरण कंपनीला दिल्याने ग्राहकांना वाढीव बिल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच जुने मीटर बदलण्याची प्रक्रियादेखील सुरू  असल्याने ग्राहकांना भरमसाट वीज बिले येऊ लागली आहेत. ऐरोली येथील लेक व्ह्य़ू सोसायटीतील सोनाली देब यांना या महिन्यात आठ हजार रुपये बिल आले आहे. यापूर्वी ते त्यांना एक ते दीड हजार रुपये बिल येत होते. हाच प्रकार कोपरखैरणे येथील  डॉ. जयश्री पाटील यांच्याबाबतीत झाला आहे. पाटील दाम्पत्य दिवसभर घराबाहेर असूनही त्यांना या महिन्याचे बिल चक्क दहा हजार रुपये आले आहे. त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  असेच प्रकार अनेक ग्राहकांबाबत झाले आहेत. वाढीव वीज बिलाचे हे आकडे बघून ग्राहकांचे डोळे पांढरे होत असताना शेजाऱ्यांना शून्य बिल येण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. वाशी, सीबीडी, नेरुळ येथे हा प्रकार सुरू आहे.
 काही राजकीय पक्षांनी स्थानिक कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, पण ‘अगोदर वाढीव बिल भरा, नंतर बिल कमी करण्याचा विचार करू’ अशी उत्तरे दिली जात आहेत. काही ग्राहकांना गोंधळ घातल्यानंतर त्यांची बिले कमी करण्यात आल्याचेही समजते. नवी मुंबई परिमंडळाचे अधीक्षक अभियंता ए. एम. थोरात यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या वीज बिलांचे टेरिफ बदलले असल्याने वाढीव बिल येत आहेत, पण इतक्या मोठय़ा रकमेची बिले येत असतील तर त्यांची चौकशी केली जाईल. जुनी मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याने काही ग्राहकांना वाढीव बिल येत आहे. ही बिले योग्य आहेत. जुने बिल कमी येत होते म्हणून नवीन बिल तेवढेच आले पाहिजे, असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. नवीन टेरिफ आणि नवीन मीटरमधील घडी बसण्यास थोडा वेळ जाईल, असेत्यांनी स्पष्ट केले.