राष्ट्रवादीची दबंगगिरी वाशीतील व्यापाऱ्यांच्या मुळावर Print

* नवी मुंबई पालिकेतील मारहाणीच्या निषेधार्थ बाजारपेठा बंद
* व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
* पोलीस तक्रार टाळणारे नेते बंदसाठी आग्रही
नवी मुंबई / प्रतिनिधी, गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२

नवी मुंबई महापालिकेत मंगळवारी महापौर आणि उपमहापौरांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाशीतील बाजारपेठा बंद करून दबंगगिरीचे दर्शन घडविले. काँग्रेस-शिवसेनेच्या नगरसेविकांकडून चपलांचा ‘प्रसाद’ मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात साधी तक्रार दाखल करण्याचे धैर्यसुद्धा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दाखविता आलेले नाही. असे असताना वाशी सेक्टर १७ सारखी मोठी व्यावसायिक बाजारपेठ केवळ दबंगगिरीच्या जोरावर बंद करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काय साधले, असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून दबक्या सुरात विचारला जात होता.  दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही दादागिरी केली नसून उपमहापौर भरत नखाते यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद केली, असा दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी आरोग्य सभापती राजू िशदे यांनी केला. नवी मुंबईत लोकांचा विश्वास जिंकून आमचे नेते सत्तास्थानी बसले आहेत. पालकमंत्र्यांनी आम्हाला दादागिरी शिकवलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे िशदे म्हणाले.
दरम्यान, नखाते यांना झालेल्या मारहाणीमुळे माझ्या प्रभागातील अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. ज्येष्ठ नागरिकांना मनापासून वेदना झाल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वत:हून सकाळी दोन तास मार्केट बंद केले होते, असा दावा राष्ट्रवादीचे आणखी एक नगरसेवक किशोर पाटकर यांनी केला.
मंगळवारी झालेल्या महासभेत महत्त्वाच्या विषयांवर बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस-शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर महापौरांची वाट अडवून धरली. या वेळी महापौरांच्या बचावासाठी आलेले उपमहापौर भरत नखाते यांना शिवसेनेच्या महिला नगरसेविकेने चपलांचा प्रसाद दिला, तर काँग्रेस नगरसेविका इंदुमती भगत यांनी नखाते यांच्या पाठीत बुक्के हाणले. एवढे सगळे होऊनही नगरसेविका माझ्या आई, बहिणीसारख्या आहेत अशी भूमिका घेत नखाते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करणे टाळले. मंगळवारी समंजस भूमिका घेणाऱ्या नखाते यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बुधवारची सकाळ उजाडताच वाशी सेक्टर एकची बाजारपेठ सकाळी बंद पाडली. त्यापाठोपाठ नखाते यांना पाठिंबा देण्यासाठी वाशी सेक्टर ९, १०, १५, १६ या राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या भागातील बाजारपेठाही बंद पाडण्यात आल्या. दुपारी उशिरा नवी मुंबईचे कमर्शिअल हब असणारी सेक्टर १७ येथील बाजारपेठ बंद पाडण्यात आली. या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांना आपली दुकाने का बंद केली जात आहेत, याचा थांगपत्ताही नव्हता. अनेकांना नखाते यांना झालेल्या मारहाणीची कल्पनाही नव्हती. तरीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुकाने बंद करत फिरत होते. दरम्यान, सभागृहात विरोधकांना बोलू दिले असते तर ही आफतच ओढविली नसती, अशी प्रतिक्रिया वाशी सेक्टर १७ येथील एका ज्येष्ठ व्यापाऱ्याने दिली. सभागृहात झालेल्या गोंधळाबद्दल आम्हाला का वेठीला धरले जात आहे, असा सवाल वाशी सेक्टर १० येथील सुमन सरकार या व्यापाऱ्यांनी विचारला.