अतिक्रमण कारवाईविरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दमबाजी Print

नवी मुंबई/ प्रतिनिधी
घणसोली गावात उभ्या राहात असलेल्या अतिक्रमणांना महापालिकेने नोटिसा बजाविल्याने संतापलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक संजय पाटील ऊर्फ अंकल यांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत दबंगगिरीचे दर्शन घडवीत ‘याद राखा पुन्हा घणसोलीत पाऊल ठेवाल तर’, अशा शब्दात अधिकाऱ्यांना दम भरला. ‘घणसोली दंगल तुम्हाला आठवतच असेल. यापुढे घणसोलीत हात घालून दाखवाच’, अशा शब्दात पाटील यांनी अधिकाऱ्यांना भर सभेतच इशारा दिला. पाटील यांची दबंगगिरी बेफानपणे सुरू असताना महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकारी माना खाली घालून निमूटपणे ऐकत होते. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिठाची गुळणी धरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी नेरुळ परिसरात उभ्या राहात असलेल्या अनधिकृत बांधकामांचा विषय हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित केला होता. या वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष गायकर यांच्यावर शेट्टी यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक विलास भोईर, अपक्ष नगरसेवक एम. के. मढवी यांनी टीकेचे प्रहार केले. अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा या नगरसेवकांनी जोमाने लावून धरला. त्यामुळे उत्तरे देताना गायकर यांचीही दमछाक होताना दिसत होती. मात्र, या मुद्दय़ावर बोलावयास उठलेले राष्ट्रवादीचे घणसोलीतील नगरसेवक संजय पाटील यांनी वेगळाच सूर लावत कारवाईसाठी अतिक्रमणांना नोटिसा बजाविणाऱ्या अधिकाऱ्यांनाच दम भरला. घणसोली तसेच आसपासच्या परिसरात काही ठराविक बांधकामांनाच अतिक्रमण विभाग नोटिसा बजावते, असा पाटील यांचा आक्षेप होता.
घणसोलीतील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांकडे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डोळेझाक करतात, असे पाटील यांचे म्हणणे होते. मात्र, आपले मुद्दे मांडत असताना पाटील यांची गाडी घसरली आणि त्यांनी धमकविण्याची भाषा सुरू केली. ‘कोपरखैरणे रस्त्यावर एस. के. बिल्डरने बांधलेले बांधकाम तुम्हाला दिसत नाही. घणसोली गावातील बांधकामे मात्र तुम्हाला दिसतात. घणसोली हे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव आहे. गावचा इतिहास तर तुम्हाला माहीतच आहे. या ठिकाणची दंगल तुम्ही विसरलात का, असा सवाल करत पाटील यांनी यापुढे कारवाई करून दाखवाच’, असे आव्हान दिले. घणसोलीच्या शहरी भागात कामे करताना हा सिडकोचा परिसर आहे, असे तुम्ही सांगता. मग या ठिकाणी नोटिसा (अतिक्रमणाबाबत) देण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे, असा सवाल पाटील यांनी केला. यापुढे घणसोलीत येऊन पाहा, मग बघा आम्ही काय करतो ते, अशी धमकीच पाटील यांनी गायकर यांना भरली.
महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाटील यांची दबंगगिरी सुरू असताना एकाही अधिकाऱ्याने याविषयी ब्रदेखील उच्चारला नाही. महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांच्या एकूणच धोरणामुळे सध्या अधिकाऱ्यांना वाली उरला नसल्याची चर्चा या प्रकारानंतर महापालिका वर्तुळात सुरू होती.