जन्मापासूनच जन्नतच्या नशिबी जहन्नुम Print

विकास महाडिक, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

राज्यातील स्त्री-भ्रूण हत्येचे प्रकार रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना केवळ मुलगी झाली म्हणून सुनेला सासरी नेण्यास स्पष्ट नकार दिल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. घरी नेण्यास नकार देणाऱ्या या कुटुंबाने या कारणावरून तलाक देण्याचीही तयारी सुरू केली असून पाच महिन्यांच्या जन्नतला तिच्या वडिलांचे छत्र मिळावे, त्यासाठी नसीमबानूने न्यायालयीन लढा लढण्याची तयारी सुरू केली आहे.


नवी मुंबई नेरुळ येथील सेक्टर १० मध्ये राहणाऱ्या नसीमा शेख या तरुणीचा साडेतीन वर्षांपूर्वी ट्रॉम्बे-चिता कॅम्प येथील उस्मान सय्यद यांच्याशी मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला. पूर्वीची नसिमा आणि आत्ताची नसीमबानू लॅब असिस्टंट म्हणून नेरुळमध्ये काम करीत होती. लग्नानंतर तिला ही नोकरी सोडावी लागली. उस्मान वाणिज्य शाखेचा पदवीधर असून तो दुबईत एका खासगी कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर पहिले एक वर्ष इतर सुखवस्तू कुटुंबाप्रमाणे ठीकठाक गेले. त्यानंतर नसीमबानूचे नशीब फिरण्यास सुरुवात झाली. दुबई येथे काम करणारा तिचा पती कामानिमित्ताने पुन्हा दुबईला गेला. लग्नानंतर तो जेमतेम एक महिना येथे राहिला होता. त्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांत उस्मान चार वेळा भारतात आला. या काळात नसीमबानूच्या सासू नूरजहाँ सय्यद, सासरे गुड्डू सय्यद, नणंद अनुक्रमे बरकतुननिसा व गुलाबुनिसा मानसिक व शारीरिक छळ करीत होत्या. काही दिवसांनी हे दिवसही जातील या अपेक्षेने नसीमबानू हे सर्व सहन करीत होती. गतवर्षी नसीमबानू गरोदर राहिली. त्याच वेळी तिला तंबी देण्यात आली. ‘लडम्का हुआ तो तुम्हे रखेंगे, लडम्की हुई तो हम उसको स्वीकार नहीं करेंगे,’ हे ऐकून नसीमबानूच्या पायाखालची वाळू सरकली होती.
नसीमबानूचा एक दीर तसेच नणंदेलाही मुलगी असताना सासू अशी कशी बोलू शकते, या विचाराने नसीमबानूला ग्रासले होते. स्वत:च्या मुलींना चांगले शिक्षण देणाऱ्या सय्यद कुटुंबातील गुलाबुनिसा इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे तर बरकतुनिसा बारावीला आहे. बाळंतपणासाठी नसीमबानू सात महिन्यांपूर्वी नेरुळमध्ये माहेरी आली. २१ मे रोजी तिला मुलगी झाली. नसीमबानूने मोठय़ा आवडीने मुलीचे नाव जन्नत ठेवले आहे. मात्र जन्मापासूनच जन्नतच्या नशिबी जहन्नुम आले आहे. जन्नतच्या या जगात आल्यापासून सासरच्यांनी व पतीनेही नसीमबानूशी बोलणे टाकले. आता तर नसीमबानूला तलाकची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे नसीमबानूला पोलिसांकडे जाण्यावाचून पर्याय नव्हता. तिने नेरुळ पोलीस ठाण्यात आपले सासू-सासरे, दोन नणंदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुस्लीम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करीत आहेत, पण दोन सुशिक्षित कुटुंबातील हा अशिक्षितपणा आजही कायम असल्याचे या घटनेवरून स्पष्ट दिसून येते आहे.