नवी मुंबईत पालिका रुग्णालयांची कामे अंतिम टप्प्यात Print

* ऐरोली, नेरुळ येथे नवी व्यवस्था
* प्रत्येकी १०० खाटांची रुग्णालये
* २२ कोटींच्या वाढीव कामांना मंजुरी
* मे अखेरीस कामे पूर्ण होणार
प्रतिनिधी
वाशी येथील ३०० खाटांच्या रुग्णालयापाठोपाठ नवी मुंबई महापालिकेने नेरुळ आणि ऐरोली येथे प्रत्येकी १०० खाटांची आणखी दोन रुग्णालये उभारण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या असून पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या रुग्णालयांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी पत्रकारांना दिली. शहरात शासकीय रुग्णालयांचे जाळे अधिक विस्तारले जावे या हेतूने उभारण्यात येणारी ही दोन रुग्णालये सर्वसामान्यांसाठी आधुनिक सुविधा देणाऱ्या ठरतील, असा दावाही पाटील यांनी केला. नवी मुंबई महापालिकेने शहरातील सर्वच उपनगरांमध्ये नागरी आरोग्य केंद्र तसेच माता बाल रुग्णालयांची उभारणी केली आहे. तसेच वाशी येथे ३०० खाटांचे मोठे रुग्णालयही महापालिकेमार्फत चालविले जाते. वाशी येथील सर्वसामान्य रुग्णालयाचा मोठा भाग हिरानंदानी रुग्णालयास भाडे पट्टयावर चालविण्यास देण्यात आला आहे. याठिकाणी सुपरस्पेशालीटी रुग्णालय चालविले जाते. मात्र, हिरानंदानी फोर्टीस रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना पुरेशा प्रमाणात सुविधा पुरविण्यात येत नाहीत, अशी ओरड नगरसेवकांकडून नेहमीच सुरू असते. नवी मुंबईचा भौगोलिक विस्तार मोठा असून ऐरोलीपासून बेलापूपर्यंत महापालिकेची हद्द आहे. याशिवाय पनवेल, कळंबोली, कामोठे या भागातूनही महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात विविध उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. ऐरोली, दिघा तसेच बेलापूर परिसरातून वाशी येथील मोठय़ा रुग्णालयात उपचारासाठी येताना रुग्णांचे हाल होतात, असा मुद्दा सुरूवातीपासून मांडला जात होता. याशिवाय मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेतील रुग्णालयीन व्यवस्थेचा विस्तार आणखी व्हावा, असा आग्रह धरला जात होता. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने ऐरोली आणि नेरुळ या दोन उपनगरांमध्ये प्रत्येकी १०० खाटांचे दोन रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या रुग्णालयांच्या बांधणीचा काम मंदगतीने सुरू असल्याची ओरड होत होती. अखेर अभियंता विभागाने या कामांचा वेग वाढवला असून येत्या मे महिन्याच्या अखेरीस दोन्ही रुग्णालयांचे काम पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी वृत्तान्तला दिली. रुग्णालयातील वाढीव कामांचे सुमारे २२ कोटी रुपयांचे प्रस्तावांना बुधवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. रुग्णालयाचे अंतर्गत सजावटीचे काम शिल्लक असून हे काम पूर्ण होताच पुढील वर्षी मे अखेपर्यंत कामे पूर्ण होतील, असा दावा पाटील यांनी केला. नेरुळ तसेच ऐरोली अशा दोन्ही ठिकाणी उभारण्यात आलेली ही रुग्णालये प्रशस्त असून सर्वसामान्य रुग्णांच्या सोयी-सुविधांचा योग्य विचार करूनच त्यांची उभारणी करण्यात आली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रुग्ण्यालयांची उभारणी होत असताना त्यामध्ये लागणारे डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी वर्गाच्या भरतीसंबंधीची प्रक्रियाही येत्या काळात सुरू केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या प्रशासन विभागाचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी दिली.