एकापेक्षा एक सरस उखाण्यांनी पतीराजांची दांडी गुल! Print

प्रतिनिधी, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

वाशीच्या मुख्य रस्त्यावरील डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई, विस्तीर्ण असे मैदान, स्वंतत्र वाद्यवृंद, महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह, उखाण्याची लक्षवेधी स्पर्धा, मंगळागौर सादरकर्त्यांमधील चुरस अशा जोशपूर्ण वातावरणात वाशीतील महिलांनी बुधवारी उत्साह, मस्ती आणि मनोरंजनाचा आनंद घेतला. ‘जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत लोकसत्ता ९९९ ’ च्या कार्यक्रमात महिलांनी सादर केलेल्या उखाण्यांनी या कार्यक्रमात हास्याचे चांगलेच फवारे तर उडालेच, पण त्याचबरोबर पतीराजांची दांडीही गुल झाली. वाशी सेक्टर नऊ येथील जय भवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात मिळणारा प्रतिसाद बघून नवी मुंबईत असे आणखी कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
नगरसेवक किशोर पाटकर यांची पत्नी वैशाली पाटकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच लोकसत्ता ९९९ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील महिलांनी आवर्जून हजेरी लावली होती. ‘डोळे मिटून प्रेम करते ती प्रियेसी पण डोळे उघडे ठेवून प्रेम करते ती बायको’ यासारखी कोटी आणि ‘इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कव्हर आणि कांदूळकराचे नाव घेते मी त्यांची लव्हर’ यासारख्या उखाण्यांनी उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली. जेजुरीच्या खंडेराया जागराला या या... जागराने कार्यक्रमाची जोरदार सुरुवात झाली. ‘पासिंग द बॉल’मधील शिक्षेने तर अनेकांची तारांबळ उडाली. या खेळात संगीत थांबवल्यावर चेंडू हातातच रहिल्याने प्रतीक्षा मानकामे यांनी ‘अगबाई डगोबाई ’हे गाणे म्हटले तर पूजा पारसेकर यांनी पास्त्याची रेसिपी सांगितली. या खेळाच्या विजेत्या डॉ. तृप्ती जेमसे ठरल्या. उत्कर्ष कला मंचाने सादर केलेली पारंपरिक मंगळागौर अनेकांचे आर्कषण ठरली. त्यातील, फुगडय़ा, घागर, टाळ्या, लाटय़ा यांसारख्या खेळांनी प्रक्षेकांचे मनोरंजन केले. यातील ‘सासूबाय दम देते रोज वाचायचा लोकसत्ता, अभय आहेत माझे अक्षयकुमार आणि मी आहे त्यांची लारा दत्ता’ हा उखाणा सर्वाचे लक्ष वेधून घेणारा ठरला. उखाण्याच्या स्पर्धेत योगिता कांदूळकर यांनी बाजी मारली. ‘आई तुझ्या दारी.. आले ’ या गाण्यावर नृत्य झाले. विष्णू व पूजा पारसेकर तसेच कोटेचा दाम्पत्य, यात चुरस होऊन पारसेकर दाम्पत्याने अलंकार घालण्याच्या स्पर्धेत बाजी मारली. रंग वार सण पटकन सांगणे या खेळात कल्पना शिंदे यांनी पारितोषिक पटकाविले. भरारी पथकानेही नंतर चांगली मंगळागौर सादर केली. त्यामुळे उत्कर्ष व भरारी मंडळांना पाच ग्रॅमचे चांदीचे नाणे विभागून देण्यात आले. या वेळी मंडळाचे महेश परब यांना दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. रात्री दहा वाजता या कार्यक्रमाची सांगता झाली, पण त्याची चर्चा नंतर बराच वेळ सुरू होती.