नवी मुंबई महापालिकेत १२ हजार रुपयांची दिवाळी भेट ? Print

* स्थायी समितीत ११ हजार ४०० रुपयांना मंजुरी
* महासभेत ६०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता
* कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ३५०० रुपये मिळणार
* महापालिकेच्या तिजोरीवर साडेतीन कोटी रु पयांचा भार
प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
 नवी मुंबई महापालिकेतील सुमारे २७०० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ११ हजार ४०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. महापालिका प्रशासनाने ११ हजार रुपयांचा प्रस्ताव सभेपुढे मांडला होता. स्थायी समितीने यामध्ये ४०० रुपयांची वाढ सुचविली असून येत्या महासभेत यामध्ये आणखी ६०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा सुमारे १२ हजार रुपयांची दिवाळी भेट मिळेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांसोबत करार पद्धतीवर काम करणाऱ्या सुमारे २७० कर्मचाऱ्यांना ३५०० रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे. येत्या महासभेत यामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बोनस देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी नवी मुंबई महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांना सातत्याने दिवाळीचे सानुग्रह अनुदान देण्यात येते.
गेल्यावर्षी कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना ११ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा ११ हजार रुपयांची दिवाळी भेट कायम ठेवावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांनी स्थायी समितीपुढे मांडला होता. यावर निर्णय घेताना त्यामध्ये आणखी ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांनी पत्रकारांना दिली. नवी मुंबई महापालिकेचे कामकाज उत्तम पद्धतीने सुरू असून यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाटा मोलाचा आहे. तसेच सध्याचा महागाईचा हंगाम लक्षात घेता ही वाढ करण्यात आली आहे, असे शेवाळे यांनी सांगितले. दरम्यान, यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून त्यामध्ये आणखी ६०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने वृत्तान्तशी बोलताना व्यक्त केली. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना दिवाळी भेट मिळावी, असा पालकमंत्री गणेश नाईक यांचा आग्रह आहे. त्यामुळे महासभेत १२ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 दरम्यान, या प्रस्तावामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा भार पडेल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त (प्रशासन) जगन्नाथ सिन्नरकर यांनी दिली. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसोबत करार पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वाढ दिली जाणार आहे. स्थायी समितीने या कर्मचाऱ्यांना साडेतीन हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला असून महासभेत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.