आव्हाडांच्या नावाने नवी मुंबई महापालिकेत शिमगा Print

* काँग्रेस-शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक
* पाम टॉवर प्रकरणाचे पडसाद
* नगररचना विभागही वादात
* प्रशासन दबावाखाली
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता अवधूत मोरे यांना दिलेल्या कथित धमकी प्रकरणावरून स्थायी समिती सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर काँग्रेस तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार हल्ला चढवला. नवी मुंबईतील अधिकाऱ्यांना धमकविणाऱ्या आव्हाड यांच्या विरोधात प्रशासनाने तक्रार दाखल करायला हवी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे, आव्हाड यांच्या नावाने काँग्रेस, शिवसेनेचे सदस्य शिमगा करत असताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले.  नेरुळ येथे उभारण्यात आलेली पाम टॉवर ही १२ मजली इमारत गेल्या काही वर्षांपासून वादात सापडली असून या इमारतीचे अनधिकृत असलेले दोन मजले पाडून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेरुळ सेक्टर ४२ येथील ही इमारत ज्या भूखंडावर उभी करण्यात आली आहे तो भूखंड सिडकोने आयडीबीआय बॅंकेतील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारण्यासाठी दिला होता. मात्र, नेरुळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्समधील रिकामी असलेली घरे खरेदी करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आणि हा भूखंड एका गृहनिर्माण संस्थेला विकण्यात आला. या गृहनिर्माण संस्थेने त्रिमूर्ती बिल्डरच्या माध्यमातून या ठिकाणी ‘पाम टॉवर’ ही इमारत उभारली. मात्र, इमारत उभारत असताना या ठिकाणी तळमजल्यावर व्यावसायिक गाळ्यांची उभारणी करण्यात आली. हे व्यावसायिक गाळे सध्या वादाचा केंद्रिबदू बनले असून, या प्रकरणामुळे महापालिकेचा नगररचना विभागही वादात सापडला आहे. या भूखंडाचा मूळ वापर रहिवासी असताना त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे कसे उभे राहिले, यावरून वाद निर्माण झाला असून नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांचे वर्तन याप्रकरणी संशयास्पद असल्याचा आरोप या वसाहतीमधील रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी इमारत उभारणाऱ्या कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतल्याने या व्यावसायिक गाळ्यांना अभय मिळाले असून, जादा चटईक्षेत्र वापर केल्याबद्दल दोन वाढीव मजल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी आमदार आव्हाड यांनी रहिवाशांच्या बाजूने अभियंता अवधूत मोरे यांना दूरध्वनी करून धमकाविल्याची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मोरे यांच्या तक्रारीला आता राजकीय रंग चढू लागला असून, स्थायी समिती सभेत काँग्रेस-शिवसेनेच्या सदस्यांनी आव्हाड यांना अटक करावी, अशी मागणी केली. आमदार आव्हाड यांच्या विरोधात महापालिकेने स्वत: गुन्हा दाखल करायला हवा होता, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी व्यक्त केले. दरम्यान, या धमकीमुळे अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची झाले असून प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहायला हवे, असे मत शिवसेनेचे नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी व्यक्त केले. आमदाराने दिलेल्या धमकीची योग्य दखल घेतली नाही, तर भविष्यात गंभीर परिणाम होतील, असेही बिस्ट म्हणाले.
रहिवाशांनी मागितली आव्हाडांकडे दाद
दरम्यान यासंबंधी पाम टॉवर वसाहतीचे अध्यक्ष होडावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्न उपस्थित केले. रहिवासी वापरात असलेले मजले पाडण्यासाठी आग्रही असणारे महापालिका प्रशासन बिल्डरने अनधिकृतपणे उभारलेल्या व्यावसायिक गाळ्यांकडे डोळेझाक कशी करते, असा सवाल होडावडेकर यांनी उपस्थित केला. आव्हाड यांनी रहिवाशांच्या वतीने दूरध्वनी केला होता. बिल्डरच्या विरोधात महापालिका आम्हाला दाद द्यायला तयार नाही म्हणून आम्ही आव्हाड यांच्याकडे हा विषय नेला, असेही होडावडेकर यांनी सांगितले. नगररचना विभागाचे कामकाज संशयास्पद असून वसाहतीच्या पायथ्याशी गाळे कसे उभे राहिले याचा शोध घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.