असेल सुंदर सिडकोचे घर..! Print

विकास महाडिक, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

सिडकोने खारघर येथील नव्या प्रकल्पात ‘निकृष्ट बांधकामाचा उत्कृष्ट नमुना’ ही बदनाम ओळख पुसण्याचा प्रयत्न केला आहे. येथील एक हजार २२४ घरे बांधण्यासाठी थ्री-एस टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून खासगी बिल्डरांशी स्पर्धा करता यावी म्हणून सिडकोने प्रथमच नमुना घर (सॅम्पल प्लॅट) तयार केले आहे. एखाद्या शासकीय संस्थेने अशाप्रकारे ‘नमुना घर’ तयार करून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा राज्यातील पहिलाच प्रयत्न आहे. जानेवारी महिन्यात या घरांची सोडत निघणार असून त्याचा भाव पाच हजार रुपये चौरस फूट फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहर वसविण्याची जबाबदारी घेतलेल्या सिडकोने गेली काही वर्षे घरनिर्मितीला पूर्णविराम दिला होता. त्यामुळे खासगी बिल्डरांचे फावले होते. सिडको शहरातील भूखंड बिल्डरांना विकून गडगंज पैसा जमा करीत होती, पण त्याच वेळी सर्वसामान्यांसाठी घर बांधण्याच्या बांधिलकीशी प्रतारणा करीत असल्याचे चित्र होते. त्यामुळे सिडकोचे धोरण बिल्डरधार्जिणे असल्याचे चित्र तयार झाले होते. यासंदर्भात शासनाकडून पाच वर्षांपूर्वी दट्टय़ा मिळाल्यानंतर सिडकोने काही गृहनिर्मिती प्रकल्प हाती घेतले. त्यात खारघर येथील स्पॅगेटी, सेलिब्रेशन, उलवा येथील उन्नती या प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र गेल्या ४२ वर्षांत केवळ एक लाख २३ हजार घरांची निर्मिती करणाऱ्या सिडकोचे हे प्रकल्प अगदीच किरकोळ आहेत. त्यामुळे सिडकोने जास्तीत जास्त गृहनिर्मिती करावी असे आदेशच राज्य शासनाने दिले आहेत. तेव्हा आता कुठे सिडको कामाला लागली असून खारघर येथे १२ हजार घरांचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातील पहिला टप्पा आकारास येत असून एक हजार २२४ घरांची निर्मिती खारघर सेक्टर ३६ ( तळोजा मध्यवर्ती कारगृहामागे) मध्ये होत आहे.  याच प्रकल्पाच्या जवळ काही दिवसांनी तीन हजार ५९० छोटया घरांची निर्मिती केली जाणार आहे. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी मध्यमवर्गीयांसाठी ६११ चौरस फुटांची ८०२ तर उच्चवर्गीयांसाठी १०७८ चौरस फुटांची ४२२ घरे बांधली जात आहेत. याशिवाय या ठिकाणी ४२ दुकाने व १०८ कार्यालये उभारली जाणार आहेत, अशी माहिती या प्रकल्पाचे व्यवस्थापक एस. एन. श्रीखंडे यांनी दिली. त्यामुळे ६.३७ हेक्टर क्षेत्रफळावर निर्सगाच्या कुशीत ही एक छोटी नगरी उभी राहणार आहे. खासगी बिल्डर या स्पर्धेच्या युगात अनेक सुविधा देतात आणि त्या बदल्यात ग्राहकाकडून चांगलीच रक्कम वसूल करीत असल्याचे दिसून येते. या प्रकल्पात सिडकोने पहिल्या मजल्यावर विस्तीर्ण असे उद्यान, क्लब हाऊस, दोन स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॉश कोर्ट, बहुउद्देशीय सभागृह, अद्यावत व्यायामशाळा, स्टिम बाथ, मेडिटेशन हॉल, योगा केंद्र, कॅफेटेरिया, क्लॉक टॉवर, जॉगिंग ट्रक, खेळाचे मैदान अशा सर्व सुविधा प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे खासगी बिल्डरांच्या तुलनेचा सिडकोसारखी निमशासकीय संस्था पण गृहप्रकल्प उभारू शकते, असा एक संदेश जाणार आहे.

चाहे नमुना देखले..
खासगी बिल्डर नमुना घर (सॅम्पल फ्लॅट) दाखवून ग्राहकांना स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातात. या सॅम्पल प्लॅटला भुलून अनेकजण खासगी बिल्डरांकडे घर आरक्षित करतात. सिडकोने प्रथमच हा फॉम्र्युला वापरला असून ७० लाख रुपये खर्च करून मध्यम व उच्चवर्गीयांसाठी बांधण्यात येणारे दोन फ्लॅट उभारले असून ते अद्ययावत व अप्रतिम आहेत. या फ्लॅटमध्ये इंटिरिअर डिझाइनही करण्यात आल्याने ते अधिक आकर्षक दिसत आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांच्या संकल्पनेतून हे फ्लॅट तयार करण्यात आले आहेत. सिडको या घरांच्या सोडती जानेवारीनंतर काढणार असून आजूबाजूच्या घरांचा विक्री अंदाज घेऊन चार ते पाच हजार रुपये प्रति चौरस फूट दर लावणार असल्याचे खात्रीलायक समजते.