खारघर हिल स्टेशनचा सिडको नव्याने Print

विकास करणार
विकास महाडिक, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगेतील पश्चिम घाटाचा एक भाग असणाऱ्या नवी मुंबईतील खारघर हिल स्टेशन (पठार)चा स्वत:च विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी हा विकास आणि त्या संदर्भातील परवानगी विकासक घेणार होता. १०० हेक्टरच्या या पठारावर ‘ड्रीम अ थीम’ संकल्पनेद्वारे बॉलीवूड हिल्स बनविण्याचा सिडकोचा प्रस्ताव असून यापूर्वी या कामासाठी एक हजार ५३० कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. ती सिडकोने नंतर रद्द केली असून आता त्या हिल स्टेशनचा नव्याने विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सिडकोला या प्रकल्पातून करोडो रुपयांचा केवळ नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
नवी मुंबईतील बेलापूर (आर्टिस व्हिलेजलगत) भागात समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंच एक विस्तीर्ण असे पठार आहे. पारसिक हिलनंतर नवी मुंबईतील हे एक दुसरे मोठे पठार म्हणता येईल. या पठाराच्या जवळपास गोल्फ कोर्स, नियोजित विमानतळ, सेंट्रल पार्क, एसईझेडसारखे मोठे प्रकल्पदेखील आहेत. या पठारावरील १५० हेक्टर क्षेत्रफळांतील १०० हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. सिडकोने या ठिकाणी छोटे हिल स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २२ सप्टेंबर २००८ रोजी निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार चार आंतरराष्ट्रीय निविदाकारांनी निविदा भरल्या होत्या. त्यातील एक निविदाकार अपात्र ठरला. शिल्लक तीनपैकी फ्यूचर सिटी प्रॉपर्टीज यांनी एक हजार ५३० कोटी रुपयांची निविदा भरल्याने त्यांना हे काम देण्याचा निर्णय सिडकोच्या मूल्यांकन समितीने घेतला होता.
सिडकोने या प्रकल्पासाठी ६३० कोटी रुपयांची अपेक्षा धरली  होती. त्यापेक्षा त्यांना अडीचपट जास्त देकार मिळाला. त्यानंतर नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची रखडलेली परवानगी मिळाली. त्यामुळे ‘नवी मुंबईतील जमिनींचे भाव वाढले आहेत. आता त्या किमतीत (१५३० कोटी) हा प्रकल्प देता येणार नाही,’ असे कारण सांगून सिडकोने २४ जानेवारी २०१० रोजी या प्रकल्पाची निविदा रद्द केली. त्या प्रकल्पाचा नव्याने विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
या पूर्वीच्या निविदेत निविदाकाराने पर्यावरण तसेच विमान प्राधिकरणाची परवानगी आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती पण सिडकोने आता या सर्व परवानग्या स्वत: घेण्याची तयारी सुरू केली आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या २० किलोमीटर परिघात इमारती उभारताना विमानतळ प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.
हे नियोजित हिल स्टेशनही या २० किलोमीटरच्या क्षेत्रफळात येत असल्याने या प्रकल्पासाठी प्राधिकरणाची विशेष परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. याशिवाय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची पर्यावरणविषयक परवानगी आवश्यक आहे. या ठिकाणी ४० टक्के बांधकाम अनुज्ञेय करण्यात आले असून ६० टक्के भागात थीम पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या वाढीव एफएसआयचा विचारदेखील आताच करण्यात येत असल्याचे सिडको व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी सांगितले. सिडको या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास सरसावली असून सर्व तयार करून दिल्यास या प्रकल्पाच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडकोच्या तिजोरीत दहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.