राष्ट्रवादीला टार्गेट करा .. मरगळ झटका Print

नवी मुंबईत काँग्रेसचा नवा फंडा
* भ्रष्टाचारविरोधी मोर्चामुळे पक्षातच संभ्रम
* सभागृहात मौन.. रस्त्यावर ओरड
* राष्ट्रवादीही आक्रमक
प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
शेकडो कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव एकामागोमाग एक असे मंजूर होत असताना मूग गिळून बसणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी नवी मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचारविरोधी मोर्चा काढण्याचे ठरविले असून या मोर्चाच्या निमित्ताने राज्यात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला लक्ष्य करायचे आणि पक्षात आलेली मरगळ झटकायची, असा नवा फंडा काँग्रेसच्या नेत्यांनी आखल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.


शिवसेना-भाजपसारखे प्रमुख विरोधी पक्ष पालकमंत्री गणेश नाईकांच्या वर्चस्वापुढे ‘बॅकफूट’वर गेल्याचे चित्र एकीकडे दिसत असताना राज्यात आणि ठाणे जिल्ह्य़ात मित्रपक्ष म्हणून वावरणाऱ्या काँग्रेसने नवी मुंबईतील सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा विडा उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटातही या मोर्चामुळे नाराजी असून भ्रष्टाचाराविरोधात बोंब ठोकणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार उरला आहे काय, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते उपस्थित करू लागले आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस पक्षातर्फे मोठा गाजावाजा करत शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनागोंदी माजली असून या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप करत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाचे निमित्त साधून काँग्रेसचे नेते जोरदार शक्तिप्रदर्शन करायच्या तयारीत आहेत. नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामांमधील अनियमितता हा तसा काही नवा विषय नाही. विजय नहाटा आयुक्त असताना महापालिकेत हजारो कोटींची कामे मंजूर झाली. ही बडय़ा रकमेची कंत्राटे सुरुवातीपासून वादात सापडली. काँग्रेसकडून नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे, दशरथ भगत, अविनाश लाड, विलास भोईर अशा बडय़ा पदाधिकाऱ्यांची फौज महापालिकेत असताना नहाटा यांनी मांडलेल्या कोटय़वधी रुपयांच्या प्रस्तावांना या पक्षाने एखाद-दुसरा अपवाद केल्यास टोकाचा विरोध केल्याचे चित्र मात्र कधीच दिसले नाही. मलनिस्सारण केंद्र, जलवाहिन्यांची कामे, ठाणे-बेलापूर रस्त्याचे फुगलेले कंत्राट मंजूर करताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी सभागृहात लावलेली ‘फिल्िंडग’ तेव्हा चर्चेत असायची. ठाणे-बेलापूर रस्त्याचे ५५ कोटी रुपयांचे वादग्रस्त वाढीव काम महासभेत मंजुरीसाठी ठेवताच काँग्रेसच्या एका बडय़ा नेत्यांने विरोधी पक्षाची भूमिका बजाविण्याऐवजी ठेकेदाराची उघडपणे बाजू घेऊन सर्वानाच तोंडात बोटे घालावयास लावली होती. वाशी, ऐरोली येथे मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारणीचे सुमारे ४०० कोटी रुपयांचे कंत्राट तत्कालीन स्थायी समिती सभापती संदीप नाईक यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या एका नेत्याने सभापतीच्या खुर्चीवर बसून मंजूर करून घेतले. शहरात यांत्रिक सफाईच्या कामात सावळा गोंधळ आहे, अशी ओरड वर्तमानपत्रात सातत्याने होत होती. मात्र, स्थायी समितीमध्ये सदस्य असणारे दशरथ भगत यांनी हे कंत्राट मंजुरीच्या बाजूने मतदान करून सर्वानाच धक्का दिला. महापालिका रुग्णालयात बीव्हीजी कंपनीला विनानिविदा साफसफाईचे १५ कोटींचे कंत्राट मंजूर होत असताना विरोध करणारे दशरथ भगत पुढे या विषयी फारसे आक्रमक दिसले नाहीत. हजारो कोटींची कामे मंजूर होत असताना बघ्याची भूमिका घेणारे काँग्रेस नेत्यांना अचानक महापालिकेतील भ्रष्टाचार कसा दिसला, असा सवाल त्यामुळेच उपस्थित होऊ लागला आहे. या मोर्चाच्या आयोजनाविषयी पक्षातील एका मोठय़ा गटात त्यामुळेच संभ्रमाचे वातावरण असून राष्ट्रवादीविरोधात रान पेटविल्याशिवाय पक्षात आलेली मरगळ दूर होणार नाही हे लक्षात आल्यानेच हा मोर्चा आयोजित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

मोर्चाला मुख्यमंत्र्यांचाही पाठिंबा : भगत
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून संख्याबळाच्या जोरावर हजारो कोटींची कामे मंजूर झाल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी केला. एखादे कंत्राट मंजूर झाल्यानंतर त्यामधील भ्रष्टाचार पुढे आला तर आम्ही आंदोलने करायची नाहीत का, असा सवालही त्यांनी केला. महापालिकेतील अनागोंदीवर पत्रकारांनी भाष्य करायला हवे. मोर्चाचा हेतू शुद्ध आहे. मित्रपक्ष असला म्हणून आम्ही भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करायची का, असा सवालही त्यांनी केला. या मोर्चाला मुख्यमंत्री तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचीही साथ आहे, असेही भगत म्हणाले.