राष्ट्रवादीच्या गडावर काँग्रेसचा मोर्चा Print

भ्रष्टाचाराविरोधात फुंकले रणशिंग
नवी मुंबई / प्रतिनिधी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असलेल्या नवी मुंबई महापालिकेवर सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांचा मोर्चा काढत शुक्रवारी काँग्रेस पक्षाने महापालिकेतील भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे रणशिंग फुंकले. महापालिकेत पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने शेकडो कोटींचा घोटाळा सुरू आहे, असा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी यावेळी पालकमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तसेच आयुक्त भास्कर वानखेडे हे सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले बनले आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनियमितता असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत आहेत. महापलिकेमार्फ त काढण्यात आलेले कचरा वाहतुकीचे २३४ कोटी रुपयांचे कंत्राट वादात सापडले आहे. याशिवाय साफसफाई करणाऱ्या ८१ ठेकेदारांचे ठेके रद्द करून दोन बडय़ा ठेकेदारांना हे कंत्राट बहाल करण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. या दोन प्रस्तावांना विरोध करत काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या महासभेत गोंधळ घातला होता. तरीही संख्याबळाच्या जोरावर २३४ कोटींचा कचरा वाहतुकीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मंजूर करून घेतल्याने महापलिकेचे कामकाज वादात सापडले आहे. महापालिकेतील प्रशासकीय कामकाजावर आयुक्त वानखेडे यांचे नियंत्रण नाही, असा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे.
या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी बेलापूर किल्ला येथून काढण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या मोर्चास चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, सिडकोचे संचालक नामदेव भगत तसेच पेट्रोकेमिकल महामंडळाचे अध्यक्ष चंदू राणे अशा नेत्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या मोर्चात पालकमंत्री नाईक यांच्या नावाने शिमगा करण्यात आला. नवी मुंबईतील अनेक कंत्राटे शेकडो कोटी रुपयांनी फुगवली जात असून त्यास सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचारी कारभार कारणीभूत आहे, असा आरोप दशरथ भगत यांनी यावेळी केला. महापालिकेतील जवळपास प्रत्येक कंत्राटामध्ये पाच टक्क्यांचा व्यवहार होत असून, कंत्राटदारांच्या बैठका घेऊन टक्केवारीचे पैसे उघडपणे मागितले जात आहेत, असा आरोपही भगत यांनी केला.
आयुक्त भास्कर वानखेडे यांच्या डोळ्यांदेखत हा सगळा सावळा गोंधळ सुरू असून अधिकारी वर्ग प्रचंड दबावाखाली काम करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते रमाकांत म्हात्रे यांनी यावेळी केला. नवी मुंबईत सुपारीचा खांडही कोणाला खाऊ दिला जाणार नाही, अशा वल्गना करणारे गणेशदादा स्वत:च भ्रष्टाचाराच्या सिंहासनावर आरूढ झाले आहेत, असा आरोप नामदेव भगत यांनी केला.
दरम्यान यावेळी आपल्या विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन काँग्रेस नेत्यांनी आयुक्तांना दिले. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आयुक्तांची बदली करा, अशी मागणी आपण मुख्यमत्र्यांकडे करणार आहोत, असेही भगत यांनी सांगितले.