खदखदणाऱ्या स्वकीयांना पालकमंत्र्यांचा धक्का Print

उपमहापौरपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीत रंगले नाटय़
जयेश सामंत
नवी मुंबईच्या महापौरपदी सागर नाईक यांची फेरनिवड होणार हे जवळपास पक्के असताना उपमहापौरपदाच्या निवडीवरून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रंगलेल्या नाटय़ामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादीचे कोपरखैरणे भागातील ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांची उपमहापौरपदी निवड होणार, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चिल्या जात होत्या. मात्र, शिवराम यांच्या निवडीस पक्षातील जवळपास २५ नगरसेवकांनी विरोध करीत पालकमंत्र्यांकडे राजीनाम्याचा इशारा दिल्याने नेरुळचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गावडे यांना या पदाची लॉटरी लागल्याची चर्चा मंगळवारी होती. पक्षात राहूनही नाईकविरोधी राजकारण केल्याचा थेट फटका शिवराम यांना बसला असून गावडे यांची निवड करून पालकमंत्र्यांनीही पक्षात खदखद निर्माण करणाऱ्या स्वकीयांना धक्का दिल्याची चर्चा आता रंगली आहे.
नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असल्याने पुढील अडीच वर्षांसाठी महापौर, उपमहापौरपदी याच पक्षाच्या नगरसेवकाची निवड होणार हे तर पक्के होते. अडीच वर्षांपूर्वी पोरसवदा असलेल्या सागर नाईक यांची महापौरपदी निवड करुन नाईकांनी घराणेशाहीलाच प्राधान्य दिले. मात्र, महापौरपदाच्या काळात सागर नाईक यांनी महापालिकेच्या कामकाजावर मिळवलेली हुकूमत लक्षात घेता पुढील अडीच वर्षांसाठी या पदावर त्यांचीच निवड केली जाईल हे अपेक्षित मानले जात होते. त्याप्रमाणे महापौरपदासाठी सागर यांचे नाव घोषित करण्यात आले. मात्र, खरी चुरस उपमहापौरपदासाठी होती. उपमहापौर म्हणून दोनदा निवड होऊनही निष्क्रिय ठरलेले भरत नखाते यांची या पदासाठी फेरनिवड होणार नाही हे तर स्पष्टच होते. ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी नाईकांविरोधात उघडपणे रणशिंग फुकल्याने तेही या स्पर्धेतून बाद झाले होते.
मोरे यांच्याजागी अनंत सुतार यांची सभागृह नेतेपदी निवड करुन नाईकांनीही त्यांचाही पत्ता एकप्रकारे कट केला होता. तुर्भे स्टोअर येथील नाईक यांचे कट्टर समर्थक सुरेश कुलकर्णी यांनी स्थायी समितीवर डोळा ठेवत हे पद नाकारले. त्यामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले कोपरखैरणे येथील ताकदवान नगरसेवक शिवराम पाटील यांची या पदावर निवड होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विजय चौगुले यांना ठेंगा दाखवत शिवराम राष्ट्रवादीत आले आणि संदीप नाईक यांच्या विजयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. मात्र, राष्ट्रवादीत येऊनही नाईक यांची अनेक धोरणे शिवराम यांना पटत नव्हती. शिवराम यांचा अभियंता विभागावर असलेला दबदबा नाईक यांना मोडून काढता आला नव्हता.
शिवराम, अनंत सुतार आणि विठ्ठल मोरे या त्रिकुटाचे ‘कारनामे’ राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनाही मान्य नव्हते. त्यामुळे उपमहापौरपदासाठी शिवराम यांचे नाव पुढे येताच पक्षातील जवळपास २५ नगरसेवकांनी या नावाला थेट विरोध केल्याने मंगळवारी सत्ताधाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली.
घणसोलीतील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाने महापौर सागर नाईक यांची भेट घेतली आणि शिवराम यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे शिवराम यांना डावलणे नाईक यांनाही सोपे गेल्याची चर्चा आहे.  अशोक गावडे यांची निवड करून नाईक यांनी नवी मुंबईत मोठय़ा संख्येने असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील मतदारांनाही खूश केले आहे. दिलीप वळसेपाटील यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक म्हणून गावडे ओळखले जातात.