गांधीजींचे विचार शाश्वत- डॉ. अभय बंग Print
पुणे वृत्तान्त

प्रतिनिधी
‘‘बदलती जीवनशैली आणि सामाजिक परिस्थितीत वाढत चाललेली हिंसा, भांडवलशाही, वाढलेला लोभीपणा, त्यातून निर्माण होणारे सामाजिक ताण या सर्व समस्यांची उत्तरे गांधीजींनी मांडलेल्या तत्त्वज्ञानात आहेत, म्हणूनच त्यांचे विचार हे शाश्वत आहेत,’’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मंगळवारी व्यक्त केले.
‘अखंड प्रेरणा गांधी विचारांची’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ‘गांधी विचारांची समर्पकता’ या विषयावर डॉ. बंग बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले उपस्थित होते.
या वेळी डॉ. बंग म्हणाले, ‘‘गांधीजी ही अखंड प्रेरणा आहे. अनेक दिग्गजांना त्यांच्या विचारातून दिशा मिळाली आहे. अनेकांच्या यशाचे बीज हे गांधीजींच्या विचारात आहे. फक्त गांधीजींचे चरित्र वाचून अनेकांचे आयुष्य बदलले आहे. गांधीजींचे चरित्र समजून घेणे, हाच एक तत्त्वज्ञानाचा मोठा अभ्यास आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये गांधीजींचे विचारच समाजाला तारून नेतील. त्यांनी मांडलेली मूल्ये इतकी शाश्वत आहेत, की गेली अनेक दशके जे सामाजिक बदल झाले, त्या प्रत्येक लाटेमध्ये ती टिकून आहेत. प्रत्येक युवकाने गांधीजी समजून घेतले पाहिजेत.’’