दुसऱ्या दिवशी तेवीस हजार चौरसफूट बांधकाम पाडले Print
पुणे वृत्तान्त

प्रतिनिधी
बेकायदा बांधकामांवर महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या धडक कारवाईच्या दुसऱ्या दिवशी बांधकाम सुरू असलेल्या नऊ बेकायदा इमारती पाडण्यात आल्या. धनकवडी, मोहननगर, प्रतिभानगर येथील इमारती या कारवाईत मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. कारवाईला काही नगरसेवकांकडून सोमवारी विरोध करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी मात्र माननीयांनी विरोध केला नाही. दिवसभरात २३ हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुधीर कदम यांनी कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत दिली. कारवाईसाठी धनकवडी सर्वेक्षण क्रमांक ७, सर्वेक्षण क्रमांक ३७/३४, मोहननगर आणि सर्वेक्षण क्रमांक ३७ प्रतिभानगर अशा तीन विभागातील मिळून नऊ इमारतींचे बांधकाम मंगळवारी पाडण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. सर्वे. क्र. ७ मधील तीन इमारतींचे तळ मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. या तीनही इमारतींचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच याच भागातील पार्किंग अधिक दोन मजले आणि पार्किंग अधिक एक मजला अशा स्वरूपाचे बांधकाम केलेल्या दोन इमारतीही पाडण्यात आल्या. या भागातील ५,६०० चौरसफूट बांधकाम दिवसभरात पाडण्यात आले.
मोहननगर भागातील बारा हजार चौरसफुटांची पाच मजली इमारत पाडण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात आले होते. ते आज दिवसभरात पूर्ण करण्यात आले. या इमारतीचे कॉलम लोंबकळत असल्यामुळे संपूर्ण इमारत पाडणे आवश्यक होते. त्यासाठी संपूर्ण इमारत पाडण्यात आली. याच भागातील चार मजली (९,९०० चौरसफूट बांधकाम) आणि तीन मजली (३,५०० चौरसफूट बांधकाम) इमारतीही पाडण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. प्रतिभानगरमधील पाच मजली इमारतही या कारवाईत पाडण्यात आली. हे बांधकाम ४,००० चौरसफुटांचे होते.
कारवाईला सुरुवात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून विरोध झाला. मात्र, नागरिकांना दूर करून कारवाई पूर्ण करण्यात आली. पहिल्या दिवशी अनेक नगरसेवक कारवाईला आक्षेप घेत पुढे आले होते. दुसऱ्या दिवशी मात्र नगरसेवकांकडून विरोध झाला नाही.
ज्या इमारतींवर कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी पुन्हा कोणतेही बांधकाम करता येणार नाही अशा पद्धतीने पाडकाम केले जात आहे. बांधलेल्या स्लॅब गॅसकटरने तोडल्या जात आहेत तसेच त्यांना ड्रीलरने मोठी भोके पाडली जात आहेत. वीटकामही पाडण्यात येत आहे. बेकायदेशीररीत्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवर ही कारवाई केली जात असल्याचेही सांगण्यात आले.
कारवाईसाठी सव्वाशे पोलीस, शंभर बिगारी सेवक आणि शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. इमारती पाडताना १५ जेसीबी, १० गॅस कटर, १० ब्रेकर, पोकलेन आणि इमारतींचे कॉलम व स्लॅब यांत्रिक कात्रीत पकडून ते पाडून टाकणारी दोन अत्याधुनिक यंत्र कारवाईसाठी वापरण्यात आली.