व्यसनाधीनता कमी करण्यासाठी लोकचळवळ हवी - हर्षवर्धन पाटील Print

व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोप
प्रतिनिधी
कायदा करून व्यसनाधीनता कमी होणार नाही. व्यसनाधीनता कमी होण्यासाठी कायद्याला लोकचळवळीचा पाठिंबा मिळायला हवा. असे प्रतिपादन सहकार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे केले. राज्य शासनाच्या समाजकल्याण आयुक्तालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, राज्यमंत्री सचिन अहिर, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल अवचट, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सिंधूताई सपकाळ, आमदार विजय खडसे, माजी आमदार उल्हास पवार, सचिन आर. डी. शिंदे, आयुक्त आर. के. गायकवाड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मौलिक काम करणाऱ्या ३० व्यक्ती व १९ संस्थांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात पोलीस उपायुक्त संजय शिंदे, तसेच पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे यांचा समावेश आहे.
पाटील म्हणाले, समाजातील व्यसनाधीनता संपविण्याचे कार्य एकटे शासन करू शकणार नाही. त्यासाठी समाजाची लोक चळवळ निर्माण करायला हवी. त्याचबरोबर व्यसनांना प्रतिष्ठा प्राप्त होता कामा नये. कारण त्यामुळे त्यांचे अनुकरण करण्याची सर्वानाच इच्छा होते. ही बाब रोखायला हवी.
सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले, व्यसनमुक्तीच्या मोहिमेला राज्य शासनाने आता प्राधान्य दिले आहे. त्यासाठी निधीचीही तरतूद केली आहे. आता समाजाने ही चळवळ लोकचळवळ करायला हवी. राज्यमंत्री सचिन अहिर म्हणाले, की व्यसनमुक्तीच्या माध्यमातून सशक्त आणि समृद्ध समाजाच्या निर्मिती करणार आहोत. त्यात सर्वानी आपले योगदान द्यायला हवे.