युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यात शिक्षक, पालकांची भूमिका महत्त्वाची Print

पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांचे मत
प्रतिनिधी
युवा पिढीला अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे मत पुण्यातील अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात ‘अमली पदार्थ व प्रतिबंधात्मक उपाय’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्यायमंत्री व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, संमेलनाध्यक्ष अनिल अवचट, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे, आयुक्त आर. के. गायकवाड, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल आदी उपस्थित होते. डॉ. शिंदे म्हणाले, ‘सध्याच्या युवा पिढीचा कल अमली पदार्थाच्या सेवनाकडे वाढत असून यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. एकाकीपणा, मुलांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष, चांगल्या मार्गदर्शनाचा अभाव तसेच व्यसनी मित्रांची संगत व अमली पदार्थाबद्दल असणाऱ्या उत्सुकतेच्या कारणामुळे युवक आणि युवती अमली पदार्थाचे सेवन करताना दिसतात. यामुळे दृष्टी कमजोर होणे, भूक न लागणे, जठर, फुफ्फुस निकामी होण्यासारखे भयानक आजारही उद्भवतात. याचे गांभीर्य वेळीच ओळखून पालकांनी मुलाला अमली पदार्थाच्या भीषणतेची माहिती देणे आवश्यक आहे.     
  युवकांवर वाईट परिणाम होत असल्याने अभिनेते व खेळाडूंनी व्यसनी पदार्थाच्या जाहिराती करण्याचे टाळावे, असे आवाहन करणारा ठराव येथील पहिल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनात करण्यात आला. यासह एकूण आठ ठराव मंजूर करण्याता आले.